प्रेम संबंधाला कुटुंबीयांचा विरोध ,जोडप्याने उचलले टोकाचे पाऊल


लखनऊ / विशेष प्रतिनिधी
लॅब टेक्निशियन आणि खाजगी शाळेत शिक्षिका असलेल्या तरुणीचे मागील काही वर्षांपासून प्रेम सबंध होते. तरुण हा विवाहित असल्याने मुलीच्या घरच्याकडून या संबंधाला विरोध होता. कुटुंबीय हे लग्न होऊ देणार नाही याची कल्पना आल्याने या दोघांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
सॅम कमानिश हा तरुण मूळचा केरळ चा. ४० वर्षीय लॅब टेक्निशियन सॅम याचे उत्तर प्रदेशातील पापडेकी रसूलपूर येथील २३ वर्षीय शिक्षिका आस्था याच्या सोबत सुत जुळले. सॅम हा विवाहित होता. आस्था च्या कुटुंबीयांचा या प्रेम संबंधाला विरोध होता. या दोघांचे शव उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील स्टेट बँक कॉलनीमध्ये आढळून आल्याने खळबळ उडाली.
पोलिसांनी दरवाजा तोडून दोघांच्या बॉडी बाहेर काढल्या. दोघांचे दीर्घकाळापासून प्रेमसंबंध होते, मात्र आस्थाच्या कुटुंबीयांचा या नात्याला विरोध होता, त्यामुळे या जोडप्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप आहे. सॅमने आपल्या हाताच्या नसा कापून गळफास लावून घेतला होता, तर आस्थाचा मृत्यू विष प्राशन केल्यामुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आस्थाचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या कलेवरला मिठी मारुन सॅमनेही आयुष्याची अखेर केल्याची माहिती आहे.
आस्था ही बेहाडकी येथील एका खाजगी शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होती, तर सॅम हा सहारनपूर शहरातील मेडिग्राम रुग्णालयात लॅब टेक्निशियन होता. सॅम विवाहित होता. बुधवारी सकाळी शाळेत गेलेली आस्था उशिरापर्यंत घरी परतली नाही, त्यामुळे तिचा शोध सुरु करण्यात आला. तिच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले की ती सॅमच्या संपर्कात होती आणि त्यांनी त्याच्याबद्दल संशय व्यक्त केला.
सीसीटीव्ही फूटेजमुळे उलगडा
तपासादरम्यान, पोलिसांनी दिल्ली रोडवरील मेडिग्राम रुग्णालयाला भेट दिली. तिथे त्यांना समजले की सॅम कमनीश हा देखील बुधवारी कामावरुन लवकर निघून गेला होता आणि तेव्हापासून त्याचा मोबाईल बंद होता. पोलिसांनी रुग्णालयाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले, तेव्हा आस्था आणि सॅम एका कारमधून बाहेर पडताना दिसले.खोलीचा दरवाजा तोडून शव बाहेर काढले
पोलिसांनी कार चालकाची चौकशी केली. रात्री उशिरा त्या चालकाने पोलिसांना ‘स्टेट बँक कॉलनी’मधील सॅम राहत असलेल्या भाड्याच्या खोलीपर्यंत नेले. तिथेच त्या दोघांना सोडल्याचे त्याने सांगितले. आस्थाच्या कुटुंबीयांसह पोलीस सॅमच्या तिसऱ्या मजल्यावरील खोलीपर्यंत पोहोचले. खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याने त्यांनी तो तोडून उघडला. आत सॅमची बॉडी खिडकीच्या ग्रिलला लटकलेल्या अवस्थेत आढळली; त्याच्या मनगटातील नसही कापलेली होती. आस्थाचं शव जमिनीवर पडलेलं होतं आणि तिच्या तोंडातून फेस येत होता.
पोलिसांनी त्याच रात्री त्या दोघांचेही शवविच्छेदन केले. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आस्थाची बॉडी तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आली, तर सॅमचं पार्थिव जिल्हा रुग्णालयाच्या शवगृहात ठेवण्यात आलं. पोलिसांनी सांगितले की, सॅमची पत्नी दिल्लीत राहते आणि तिच्याबाबत सध्या चौकशी सुरु आहे.पेनकिलर घेऊन जीव संपवला
पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे निष्पन्न झाले आहे की, जीव देण्यापूर्वी सॅमने वेदनाशामक औषधे घेतली होती; कारण खोलीत पेनकिलर्सची काही रॅपर्स सापडली आहेत. तपासादरम्यान असेही दिसून आले की, आस्थाच्या मृत्यूनंतर सॅमने तिला मिठी मारली होती; तिच्या कपड्यांवर रक्ताचे डाग आढळले आहेत.
प्राथमिक चौकशीवरुन हे प्रकरण दुहेरी आत्महत्येचे असल्याचे दिसून येते. आस्थाच्या कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार प्राप्त झालेली नाही. खोलीतून औषधे आणि शस्त्रक्रियेची साधनेही जप्त करण्यात आली असून त्यांची तपासणी केली जात आहे. शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचे निश्चित कारण स्पष्ट झालेले नाही; त्यामुळे पुढील विश्लेषणासाठी ‘व्हिसेरा’ राखून ठेवला जाईल, अशी माहिती एसएसपी अभिनंदन सिंग यांनी दिली.




