शिवाणीचे भूत पोलिस ठाण्यात ? म्हणाली माझ्या वडील आणि भावाला सोडा

बुलडाणा / विशेष प्रतिनिधी
वेब सिरिजला लाजवेल अशी घटना समोर आली आहे. त्यामुळे दोन राज्यातील पोलिसही गोंधळले आहेत. कारण ज्या तरुणीच्या खून प्रकरणात तिच्या वडिलांना आणि भावाला अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे वडील आणि भावाने देखील आपला गुन्हा कबूल केला होता. आता शिवानी जिवंत असल्याने अर्धवट जळालेले जे प्रेत सापडले होते,ते कोणाचे ? खून केला नसताना देखील वडील आणि भावाने गुन्हा का कबुल केला ? इतके दिवस शिवानी कुठे होती ? असे नानाविध प्रश्न या अनुषंगाने उपस्थित होत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात राजुरा जंगल परिसरात एका तरुणीचे शीर धडावेगळे करण्यात आले होते. एवढंच नाहीतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी जाळून टाकला होता. पण मृतदेह अर्धवट जळाला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. पण, या प्रकरणी पोलिसांनी बाप आणि भावाला अटक केली होती, दोघांनीही गुन्हाही कबूल केला होता. पण, अचानक मयत मुलगी पोलिसांसमोरच हजर झाली.
काय आहे प्रकरण?
जेव्हा जंगलामध्ये अर्धवट जळालेला मृतदेह आढळला होता, त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी सगळ्या बाजूने तपास केला. कुठे बेपत्ता असल्याची तक्रार आहे का, याची तपासणी केली. अखेर १२ दिवसांच्या तपासानंतर पोलिसांना मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यातील खकनार पोलीस ठाण्यात एक तरुणीची बेपत्ता असल्याची तक्रार मिळाली. पोलिसांनी मध्य प्रदेशला गेले आणि बेपत्ता तरुणीच्या घरी पोहोचले. हे घरं होतं बापुराव नथु काळमेकर (वय ५०) यांचं. बापुराव काळमेकर यांची २५ वर्षीय मुलगी शिवानी २५ एप्रिल रोजी कुणाला न सांगता घरातून निघून गेली होती.
आता शिवानीची शोध सुरू अन् बाप निघाला मारेकरी
आता मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी आता शिवानी कुठे गेली, याचा शोध सुरू केला. पण, बापुराव काळमेकर यांनी जे काही सांगितलं त्यावर संशय आला. पोलिसांनी पुन्हा बापुराव काळमेकर यांची उलटचौकशी केली. पोलिसांनी जेव्हा खाक्या दाखवल्या तेव्हा बापुराव यांनी आपणच मुलीची हत्या केल्याचं कबूल केलं.

चुलत भावासोबतच प्रेमसंबंध म्हणून शिवानीचा खून
आपली मुलगी शिवानी हिचं अमरावती येथील प्रकाश भिलावेकर नावाच्या तरुणाशी लग्न झालं होतं. पण, लग्न होऊन सुद्धा शिवानी आपल्या चुलत भावाच्या प्रेमात पडली होती. दोघांचे प्रेमसंबंध समोर आल्यामुळे बापाने शिवानीची समजूत काढली. पण, शिवानी आणि चुलत भाऊ नातेसंबंध तोडण्यास तयार नव्हते. त्यामुळे संतापलेल्या बापुराव याने २५ एप्रिल रोजी शिवानीच्या डोक्यात काठीने वार करून तिचा जिव घेतला. आता मुलगी मेली असून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने आपल्या मुलाची मदत घेतली. दोघा बापबेट्यांनी शिवानीचा मृतदेह घेऊन बुलडाण्याला दुचाकीवरून गेले. तिथे राजुरा जंगल परिसरात शीर धडावेगळे केले आणि मृतदेह पेटवून दिला. पण, मृतदेह पूर्ण जळाला नसल्यामुळे प्रकरण समोर आलं.

पोलिसांनी बापुराव आणि त्याला मुलाला ताब्यात घेतलं. न्यायालयात हजरही केलं. त्यानंतर दोघाांना पोलीस कोठडीही सुनावली. एकीकडे कोर्टात सुनावणी सुरू असताना शीर धडावेगळं मृतदेह प्रकरणाला २८ मे रोजी धक्कादायक वळण मिळालं. खून झालेली तरुणी चक्क जिवंत पोलीस स्टेशनला पोहोचली आणि हत्येच्या आरोपात अटक असलेल्या वडील आणि भावाला सोडण्याची मागणीच शिवानीने केली. हे ऐकून पोलीसही चक्रावून देले.
पोलीसही गोंधळले
“मध्य प्रदेशमधील खकणार इथं एक तरुणी बेपत्ता असल्याची तक्रार मिळाली होती. तिथे असं लक्षात आलं की, शिवानी नावाच्या मुलीचा तिच्या भाऊ आणि वडिलांनी खून केल्याची माहिती मिळाली. दोघांनी गुन्हाही कबूल केला होता. आता दोघांनी कबुली दिल्यामुळे दोघांना अटक केली. जळगावमध्ये ज्या अज्ञात महिलाचा मृतदेह सापडला होता, त्याची ओळख पटवण्याचं काम सुरू होतं. त्याचा डीएनए तपासणीसाठी दिला होता. अनोळखी महिलेचा ओळख पटवण्याचं मोठं आव्हान होतं. पण, खकणार पोलीस स्टेशनमधून पोलीस निरिक्षक अभिषेक जाधव यांचा आम्हाला फोन आला. सदरील प्रकरणामध्ये शिवानी बापुराव काळमेकर ही जिवंत असल्याचं सांगितलं. त्या तरुणीला आम्ही पोलीस स्टेशनला बोलावलं आहे, तिचा जबाब नोंदवला आहे. पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी दिली.
“आम्ही जेव्हा आरोपींना अटक केली होती, तेव्हापासून दोघांनी आमची दिशाभूल केली आहे. पहिल्या दिवसापासून दोघेही खोटी माहिती देत आले, पोलीस कोठडीत असताना आणि न्यायालयाामध्ये हजर केले असता त्यांनी खोटी माहिती दिली, आता याबद्दल तपास करत आहे’ असंही नितीन पाटील यांनी सांगितलं.
मग तो शीर धडावेगळा केलेला मृतदेह कुणाचा?
दरम्यान, जळगाव जामोदमध्ये सापडलेला मृतदेह कोणाचा आहे, तिला मारणारे मारेकरी कोण? शिवानीच्या वडील आणि भावाने खुनाचा गुन्हा स्वतःच्या अंगावर का घेतला? असे एक ना अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. या प्रकरणाचा छडा लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.




