क्राइम

स्त्रीलंपट भोंदूबाबा अशोक खरात साठी कर्मचारी ठरला काळ

Spread the love
 

नाशिक / विशेष प्रतिनिधी 

         स्त्रीलंपट भोंदूबाबा अशोक खरात याचे काळे कारनामे उघड होताच राज्यात खळबळ माजली आहे. या भोंदूबाबांचे कारनामे उघडणकरण्यात त्याच्याच एका कर्मचाऱ्याचे योगदान असल्याचे समोर येत आहे.

त्यातून त्याने बाबाच्या दालनात स्पाय कॅम बसवले आणि त्यात बाबाचे विकृत चाळे कैद केल्याचे आता पुढे येत आहे. हा प्रकार कळल्यानंतर खरात याने त्याला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या व त्याने संबंधित पेन ड्राईव्ह पोलीसांच्या हवाली केल्याचे सांगण्यात येते.

हा कर्मचारी २०१९ पासून खरात याच्याकडे काम करीत होता. काही काळापासून त्याला महिलांच्या बाबतीत खरात याच्या व्यवहाराबाबत शंका आल्या. त्यामुळे धारीष्ट्य करून त्याने कार्यालयात गुप्त कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला. कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयात खरात नसताना सायंकाळी मित्राला बोलावून त्याने छुपा कॅमेरा बसवला. त्यानंतर अनैतिक, अघोरी प्रकार होतात का याची खात्री करण्यासाठी चित्रण तपासले असता तो हादरला.

हा सगळा प्रकार समजल्यानंतर त्याने चित्रीत झालेले सर्व व्हिडिओ तसेच खरात याच्या मालमत्तेचे तपशील ताब्यात घेतले होते. त्याने कामावर जाणे बंद केल्यावर कार्यालयातील सीसीटीव्हीच्या खाणाखुणा आणि आपल्या खासगी प्रकरणांची काही महत्वाची माहिती त्याच्याकडे असल्याचे खरातला समजल्यानंतर त्याने संबंधिताला धमकावणे आणि त्रास देण्यास सुरूवात केली.

“हे बाहेर सांगितले तर जिवंत सोडणार नाही,” अशा शब्दांत दबाव टाकण्यात आल्याचे संबंधित तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.दरम्यान, मिरगाव येथील ईशान्यश्वर महादेव मंदिर ट्रस्टच्या नावावर पैसे गोळा करून काळा पैसा पांढरा करण्याचा प्रकार केल्याचा गंभीर आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

जमीन खरेदी-विक्रीशी संबंधित सहभागी लोकही चौकशीच्या रडारवर

हायप्रोफाइल ज्योतिषी अशोक खरात याच्या प्रकरणाच्या चौकशीला ‘एसआयटी’सह स्थानिक पोलिसांनी तपासाला गती दिली आहे. पथकाने रविवारी मिरगाव येथील ईशान्येश्वर मंदिराचा पुजारी, खरातच्या आलिशान बंगल्याचा वॉचमन आणि व्यवस्था पाहणारा कर्मचारी यांना नाशिकला पाचारण करत चौकशी केल्याचे वृत्त आहे. खरात याच्या मंदिरातील धार्मिक कार्यक्रमांसह जमीन खरेदी-विक्रीशी संबंधित व्यवहारात सहभागी लोकही चौकशीच्या रडारवर असल्याचे समजते.

मिरगाव येथील ईशान्येश्वर मंदिराचा परप्रांतीय पुजारी तिवारी हा गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी वास्तव्यास आहे. त्यामुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांसह व्हीआयपी भक्तांची त्याच्याकडे माहिती असू शकते. तसेच, ईशान्येश्वर मंदिर आणि खरात याचा बंगला मिरगाव गावापासून सुमारे अडीच ते तीन किलोमीटर अंतरावर आहे. मंदिर आणि बंगल्यात कोण-कोण येत हाेते अथवा कोण येऊन गेले, याबाबतची चौकशी पथकाने केल्याचे समजते.

मागील काही वर्षांपासून मंदिराची स्वच्छता आणि देखभालीचे काम सांभाळणारा कर्मचारी, तसेच फार्महाऊसची रखवाली करणारा वॉचमन या तिघांकडून अधिक माहिती मिळते काय, यादृष्टीने चौकशी करण्यात येऊन त्यानंतर त्यांना सोडण्यात आले.

‘चाकणकर यांना श्रद्धा-अंधश्रद्धेतला फरकच कळला नाही’

आयुष्यात प्रेरणास्थान, श्रद्धास्थान हे प्रत्येकाचे वेगवेगळे असू मात्र, महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर राहूनही रूपाली चाकणकर यांना श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक कळत नसेल तर हे दुर्दैव आहे, अशी टीका महिला आयोगाच्या माजी सदस्या तथा वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते यांनी केली आहे.

‘रुपाली चाकणकरच स्कँडलच्या सूत्रधार’

या संपूर्ण प्रकारच्या सुत्रधार चाकणकर असून त्यांनी हे प्रकरण थांबविण्याचा प्रयत्न केला. चाकणकर यांना हे प्रकरण माहित असतांना त्यांनी खरातला मदत केली, असा आराेप राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या, रूपाली ठोंबरे पाटील यांनी केला. भोंदूबाबा महिलांवर अत्याचार करायचा. २५० व्हिडिओ आहेत. या व्हिडिओंची संख्या १००० पर्यंत जाऊ शकते. म्हणजे हजार महिलांचं लैंगिक शोषण भोंदूबाबाने केले आहे. चाकणकर या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या स्कँडलाच्या सूत्रधार आहेत. चाकणकर यांना तातडीने अटक झाली पाहिजे. त्यांना अटक करण्यास दिरंगाई केल्यास हायकोर्टात जाईन. चाकणकर या जर पक्षात राहिल्यास मी पक्षाचा राजीनामा देईल, असेही त्या म्हणाल्या.

बडे नेते, सेलिब्रिटी पायाशी; बाजूच्या शेतकऱ्यांना त्रास

अशोक खरातकडे देश-विदेशातील बड्या लोकांसह राजकीय नेते, सेलिब्रिटी यांचा राबता असताना स्थानिक नेत्यांसह नागरिक मात्र त्याच्यापासून चार हात लांब राहिले आहेत. खरातचा शेतकऱ्यांना असलेला उपद्रव यासह त्याच्या संशयास्पद जमीन खरेदी-विक्री व्यवहारांमुळे स्थानिक त्याच्यापासून फटकून राहिल्याची चर्चा आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close