मुलाला तिने मारली लाथ आणि त्याला आला संताप अन घडलं अघटित
जयपूर /नवप्रहार डेस्क
मागील चार वर्षांपासून ते लिव्ह इन मध्ये राहत होते. ती त्याच्या सोबत नवऱ्याला सोडुन राहत होती. घटनेच्या दिवशी त्या दोघांनी दारू पिली होती. दरम्यान त्यांचे आपसात भांडण झाले. तिने रागाच्या भरात पलंगावर झोपलेल्या मुलाला लात मारली. त्यामुळे तो इतका संतापला की त्याने तिची उशीने तोंड दाबून हत्या केली. घटनेनंतर प्रियकराने असं भासवण्याचा प्रयत्न केला, की प्रेयसीने आत्महत्या केली; पण अखेरीस शवविच्छेदनातून सत्य उघड झालं.
राजस्थानच्या राजधानीचं शहर असलेल्या जयपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली. तिथल्या एका प्रियकराचा त्याच्या प्रेयसीशी जोरदार वाद झाला. ते दोघंही दारूच्या नशेत होते. त्या वेळी प्रेयसीने तिच्या मुलाला पलंगावरून लाथ मारून खाली पाडलं. यामुळे संतापलेल्या प्रियकराने प्रेयसीची हत्या केली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. आरोपीने प्रथम पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. प्रेयसीचा मृत्यू जास्त प्रमाणात दारू प्यायल्याने आणि विषप्राशन केल्याने झाला आहे, असं त्याने पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. प्रियकराची कसून चौकशी केली गेली. त्यानंतर धक्कादायक कारण उघड झालं. हे दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मृत महिला विवाहित होती. ती गेल्या चार वर्षांपासून तिच्या पतीला सोडून प्रियकरासोबत राहत होती. पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली असून, त्याने गुन्हा कबूल केला आहे.
17 नोव्हेंबरला ही घटना घडली. जयपूरच्या गांधीनगर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात कविता बैरवाचा मृतदेह तिचा प्रियकर मनीष निर्वाण याच्या घरात सापडला. हे दोघं चार वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. कविता विवाहित असून तिला एक मुलगा आहे. तो तिच्यासोबत राहत असे. कविताची प्रकृती गंभीर आहे, असं मनीषने तिच्या कुटुंबीयांना कळवलं. तिचे कुटुंबीय तिथे पोहोचले असता त्यांना कविता मृतावस्थेत आढळली. याबाबतची माहिती पोलिसांना दिली गेली. पोलिसांनी मनीषची चौकशी केली. त्या वेळी त्याने सांगितलं, की ‘कविता जास्त प्रमाणात दारू प्यायली होती. तसंच तिने विषप्राशन केलं. त्यामुळे तिचा मृत्यू झाला.’
पोलिसांनी कविताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. श्वास कोंडल्याने तिचा मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झालं. पोलिसांनी मनीषला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. मग मनीषने हत्येचं कारण सांगितलं. तो म्हणाला, की ’17 नोव्हेंबरला रात्री आम्ही दोघांनी मद्यपान केलं होतं. दारूच्या नशेत आमचं भांडण झालं. त्या वेळी कविताने पलंगावर झोपलेल्या तिच्या मुलाला जोरात लाथ मारली आणि तो खाली पडला. त्यामुळे मी संतापलो आणि कविताचे तोंड उशीने दाबलं. बराच वेळ तोंड दाबून ठेवल्याने कविताचा मृत्यू झाला.’ पोलिसांनी मनीषला अटक केली असून, प्रकरणाचा पुढचा तपास सुरू आहे.