पुरुषांच्या चुकीच्या सवयी महिलांच्या गर्भाशयाच्या कॅन्सर साठी कारणीभूत – डॉ.सारांश जैन

गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर हा महिलांमध्ये आढळून येणारा कर्करोगाचा प्रकार आहे. भारतात दरवर्षी हजारो महिलांना या आजाराचे निदान होत असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून दिसून येते.
गावखेड्यात तपासणीसाठी साधनसंपत्ती नसल्यामुळे अनेकांना या आजाराची लक्षणे लवकरच समजत नाहीत. त्यातच आरोग्य सुविधेच्या अभावामुळे त्याचे निदान अंतिम टप्प्यात होत असल्याने मृत्यूचा धोकाही वाढतो. यादरम्यान पुरुषांच्या काही चुकीच्या सवयींमुळे महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर वाढत असल्याचा दावा प्रसिद्ध मूत्रविकार तज्ज्ञ डॉ. सारांश जैन यांनी ‘न्यूज १८’ मध्ये लिहिलेल्या एका लेखातून केला आहे, त्याविषयी…
डॉ. सारांश जैन यांच्या मते, गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होण्यामागे एचपीव्ही म्हणजेच ‘ह्युमन पॅपिलोमा व्हायरस’ कारणीभूत ठरतो. या विषाणूचा संसर्ग प्रामुख्याने असुरक्षित लैंगिक संबंधांतून पसरतो. अर्थातच हा विषाणू पुरुषांमुळे होत नसला तरी काही त्यांच्या काही चुकीच्या सवयींमुळे त्याचा प्रसार होण्याची शक्यता लक्षणीयरीत्या वाढते. एचपीव्ही हा एक अत्यंत सामान्य विषाणू असून तो प्रामुख्याने शारीरिक संबंधांद्वारे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरतो. या विषाणूचे अनेक प्रकारही आढळून येतात. त्यातील बहुतांश प्रकरणांमध्ये हा संसर्ग फारसा गंभीर नसतो. तसेच शरीराची रोगप्रतिकारक शक्तीच नैसर्गिकरीत्या त्याचा नायनाट करते. मात्र, या विषाणूचे काही उच्च-जोखमीचे प्रकार शरीरात अनेक वर्षे राहू शकतात. त्यामुळे कालांतराने गर्भाशयाच्या पेशींमध्ये असामान्य बदल होत जातात. आरोग्याची वेळीच तपासणी न केल्यास त्याचे रुपांतर पुढे कॅन्सरसारख्या आजारात होऊ शकते. याच कारणामुळे पुरुषांचे लैंगिक आरोग्य, लैंगिक सवयी आणि जीवनशैलीशी संबंधित घटक महत्त्वाचे ठरतात.
एचपीव्ही संसर्गाला कोणत्या बाबी कारणीभूत?
एकापेक्षा जास्त लैंगिक जोडीदार असल्यास ‘एचपीव्ही’ संसर्गाचा धोका वाढतो. हा विषाणू योनीमार्गातून, गुदमार्गातून किंवा तोंडावाटे होणाऱ्या लैंगिक संबंधांतून पसरू शकतो. चिंताजनक बाब म्हणजे, अनेकदा एखाद्या व्यक्तीमध्ये एचपीव्ही संसर्ग असूनही कोणतीही लक्षणे दिसून येत नाही. त्यामुळे संबंधित व्यक्तीला संसर्ग झाल्याचे माहिती नसतानाही तो त्याच्या जोडीदारापर्यंत पोहोचू शकतो. मात्र, याचा अर्थ अनेक लैंगिक जोडीदार असणे हे थेट गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होण्यास कारणीभूत ठरत नाही, असे डॉ. सारांश जैन म्हणाले. लैंगिक संबंधांचे प्रमाण वाढल्याने उच्च-जोखमीच्या एचव्हीपी संसर्ग होण्याची शक्यता वाढते. त्यातील काही प्रकाराचा संबंध थेट गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरशी येतो. कंडोमचा नियमित वापर केल्यास एचपीव्ही संसर्गाचा धोका कमी होऊ शकतो. जोडीदाराची वैद्यकीय तपासणी झालेली नसल्यास सुरक्षित लैंगिक संबंधांसाठी नियमितपणे कंडोमचा वापर करणे महत्त्वाचे ठरते. तसेच कंडोमच्या योग्य वापराने इतर अनेक लैंगिक संक्रमित संसर्गांचा धोकाही कमी होऊ शकतो, असेही डॉ. जैन यांनी स्पष्ट केले.
पुरुषांच्या कोणत्या सवयी महिलांसाठी धोकादायक?
डॉ. सारांश जैन यांच्या मते, नियमित धूम्रपान करण्याची पुरुषांची सवय ‘एचपीव्ही’ संसर्ग झालेल्या महिलांसाठी धोकादायक ठरू शकते. लैंगिक संबंधादरम्यान चुंबन घेताना पुरुषांच्या तोंडातील काही विषाणू थेटपणे महिलांच्या शरीरात प्रवेश करू शकतात. त्यामुळे त्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर मोठा परिणाम होऊ शकतो. याच कारणामुळे धूम्रपान सोडणे हे संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे ठरते. बहुतांश पुरुष कोणतीही उघड लक्षणे दिसत नसल्यास वैद्यकीय तपासणी करून घेत नाहीत. त्यामुळे HPV संसर्गापासून बचाव, लसीकरण, सुरक्षित लैंगिक व्यवहार आणि त्याबाबतची जागरूकता अधिक महत्त्वाची असते. एचपीव्ही संसर्गाबाबत शंका असल्यास पुरुषांनी स्वतःहून निदान करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचा प्रतिबंध करणे ही केवळ महिलांची एकट्याची जबाबदारी नसून, वेळेवर लसीकरण, सुरक्षित सवयी आणि नियमित तपासणीत पुरुष जोडीदाराचा सक्रिय सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे.
HPV संसर्ग झाला म्हणजे कर्करोग होतोच का?
मुळीच नाही… डॉ. सारांश जैन यांच्या मते हा संभ्रम दूर करणे अत्यंत गरजेचे आहे. एचपीव्ही संसर्ग हा अतिशय सामान्य असून बहुतांश लोकांच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीच त्याला नैसर्गिकरीत्या नायनाट करते. मात्र, काही उच्च-जोखमीच्या एचपीव्ही प्रकारांचा संसर्ग दीर्घकाळ शरीरात टिकून राहिल्यास गर्भाशयाच्या मुखातील पेशींमध्ये असामान्य बदल होऊ शकतात. कालांतराने हे बदल कॅन्सरमध्ये रूपांतरित होण्याची शक्यता असते; पण हा बदल एका रात्रीत होत नसून त्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी लागतो. म्हणूनच एचपीव्ही लसीकरण, महिलांच्या आरोग्याची नियमित तपासणी आणि वैद्यकीय अहवालात काही असामान्य बदल आढळल्यास वेळेवर उपचार घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. केंद्र सरकारने नुकताच एचपीव्ही लसीकरणाचा राष्ट्रीय कार्यक्रम सुरू केला आहे. त्याद्वारे आतापर्यंत ८० लाखांहून अधिक महिलांना हा डोस देण्यात आला आहे. आता हे लसीकरण नियमित लसीकरणाच्या वेळापत्रकात समाविष्ट करण्याच्या प्रक्रियेत आहे.
HPV धोका कमी करण्यासाठी पुरुषांनी काय करावे?
- HPV संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी पुरुषांचीही भूमिका महत्वाची ठरते.
- सुरक्षित लैंगिक संबंधांचा अवलंब करणे (कंडोमचा योग्य वापर)
- एकापेक्षा जास्त लैंगिक जोडीदारांच्या संपर्कात येणे टाळणे.
- डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्वतः एचपीव्ही लस घेणे.
- धूम्रपान आणि तंबाखूचे सेवन पूर्णपणे टाळणे.
- जननेंद्रियावर कोणतीही असामान्य लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे.
- आपल्या जोडीदाराशी लैंगिक आरोग्याविषयी मोकळेपणाने चर्चा करणे.
- महिला जोडीदाराला नियमित कॅन्सरची तपासणी करून घेण्यासाठी प्रोत्साहन देणे.
गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर ही केवळ ‘महिलांची समस्या’ म्हणून पाहता येणार नाही. उच्च-जोखमीच्या एचपीव्ही संसर्गाला या कॅन्सरसाठी प्रमुख कारण मानले जाते. तसेच एचपीव्ही विषाणूचा प्रसार पुरुष जोडीदारांकडूनच होऊ शकतो. त्यांच्या काही चुकीच्या सवयींमुळे असे घडू शकते. मात्र, गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरच्या प्रत्येक प्रकरणांमध्ये पुरुषांना जबाबदार ठरवता येणार नाही, असेही डॉ. सारांश जैन यांनी स्पष्ट केले. तसेच एखाद्या महिलेचा लैंगिक इतिहास विशिष्ट प्रकारचा आहे म्हणून तिला गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर होईलच असेही नाही. सुरक्षित लैंगिक संबंध, धूम्रपान सोडणे आणि गर्भाशयाच्या मुखाची नियमित तपासणी करणे यांसारख्या उपायांमुळे महिलांमधील उच्च-जोखमीच्या एचपीव्हीचा संसर्ग आणि त्यामुळे होणाऱ्या गर्भाशयाच्या कॅन्सरचा धोकाही कमी होऊ शकतो, असेही ते म्हणाले.




