गरोदर पत्नी आणि मेहुणी वर गोळी झाडात स्वतः वरही झाडली गोळी
पती – पत्नीचा मृत्यू , मेहुणी अत्यव्यस्थ
पाटणा ( बिहार ) / नवप्रहार डेस्क
माहेरी असलेल्या पत्नीला आणण्यास गेलेल्या पतीचा पत्नी सोबत वाद झाल्याने त्याने जवळ असलेल्या पिस्तूल मधून पत्नी वर गोळी झाडली. बहिणीचा बचाव करण्यासाठी आलेल्या मेहुणीवर देखील त्याने गोळी झाडली. आणि त्यानंतर स्वतः वर गोळी झाडून घेतली. यात नवरा – बायकोचा मृत्यू झाला आहे तर मेहुणी अत्यवस्थ आहे. विशेष म्हणजे पत्नी आणि मेहुणी दोघीही गरोदर होत्या. बिहारची राजधानी पटनाला लागून असलेल्या पांडरकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.
या घटनेत तरुण आणि त्याच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्या मेहुणीला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. ही घटना बारह उपविभागातील पांडरक पोलीस स्टेशन परिसरातील बिहारी बिघा गावात घडली आहे. दोघांच्या मृत्यूनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दीपक कुमार असे मृताचे नाव आहे. काही दिवसांपूर्वी आरोपी दीपकचे त्याची पत्नी लक्ष्मीसोबत काही कारणावरून भांडण झाले होते. यानंतर लक्ष्मी सासरचे घर सोडून माहेरी आली. काही दिवस एकटा राहिल्यानंतर आरोपीने लक्ष्मीला अनेकवेळा फोन करून परत येण्यास सांगितले. मात्र तिने प्रतिसाद न दिल्याने तो स्वत: तिला परत घेण्यासाठी घरी पोहोचला. त्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि यादरम्यान आरोपीने पिस्तूल काढून पत्नीवर गोळी झाडली.
या दरम्यान, त्याची मेहुणी गुडिया तिच्या बचावासाठी आली असता आरोपीने तिच्यावरही गोळीबार केला. यानंतर आरोपीने तिसरी गोळी झाडली. या घटनेत आरोपी आणि त्याच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी गुडियाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिची प्रकृती चिंताजनक आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी घटनास्थळावरून पिस्तुलासह तीन काडतुसे जप्त केली आहेत.
प्राथमिक तपासात घरगुती वादातून हा प्रकार समोर आला आहे. सध्या पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत, तर जखमी मेहुणीच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर तिच्या जबाबाची प्रतीक्षा आहे. दरम्यान दीपकची पत्नी आणि मेहुणी या दोघीही गरोदर असल्याचे समोर आले आहे.