अकोल्यात ठक्कर व अरोरा यांच्या निवासस्थानी इन्कमटॅक्सच्या छाप्यात 25 किलो सोने आणि कोट्यावधी रुपयांची रोकड जप्त

अकोला / प्रतिनिधी
अकोला येथील अशोकराज आंगडिया कुरिअरचे कार्यालय आणि संचालक ठक्कर यांच्या नवरंग सोसायटी येथील निवासस्थानी तसेच अकोला औद्योगिक वसाहतीतील डाळ मिल उद्योजक आणि थोक सुपारी विक्रेता रोहडा यांच्या डाळ मिल, सिंधी कॅम्प येथील निवासस्थान आणि नवीन किराणा बाजारातील दुकान येथे एकाच वेळी वर्धा येथील आयकर विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी छापा टाकून कारवाई सुरू केली. झाडाझडती घेताना उद्योजक रोहडा यांच्या घरात एका बॅगेत कोट्यावधी रुपयांची रोकड व अंदाजे 25 किलो सोने बघून सर्वाचे डोळे विस्फारून गेले. अधिकारीही विस्मयचकित झाले.तसेच डाळ मिल व दुकानातून रोकड व महत्त्वाचे कागदपत्रे मिळाले आहे, असे सूत्रांनी सांगितले. अशोकराज आंगडिया कार्यालयात रोकड देवाणघेवाणबाबतची कागदपत्रे व रोख रक्कम तसेच निवासस्थानी देखील बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. सकाळपासून तर वृत्त लिहीस्तोवर सुरू असलेल्या या कारवाईत एका छाप्यात घरातून अंदाजे 25 किलो सोने आणि कोट्यावधी रुपयांची रोकड असा ऐवज जप्त करण्यात आले आहे.तर अशोकराज आंगडिया कुरिअर कडून रोख कोट्यावधी रुपये हस्तगत केले आहे.आयकर विभागाकडून सध्या अधिकृतपणे काहीही जाहीर करण्यात आले नाही. दोन्ही ठिकाणी जप्त केलेले सोने आणि कोट्यावधी रुपयांची रोकड अकोला आयकर विभागात सुरक्षित केले आहे. जप्त करण्यात आलेली रोकड मोजण्यासाठी मशिन उपलब्ध करून घेण्यात आल्या आहेत. विभागाच्या पथकात जवळपास 50 वर अधिकारी व कर्मचारी असून काल रात्रीला अकोल्यातील चार ठिकाणी या पथकाने मुक्काम केला. काल रात्रीला अकोला जिल्हा पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन बंदोबस्तासाठी पोलिसांना तैनात करण्याची कल्पना दिली. आयकर पथक अकोला मुक्कामी असून उद्या कोण रडारवर आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.