सात जणांच्या हत्या प्रकरणात पोलिसांना अल्पवयीन मुलीच्या मदतीचा संशय

बंगळुरू / क्राईम रिपोर्टर
सासरच्या पक्षातील सात लोकांची हत्या केल्या प्रकरणात कॅब चालक इंदुशेखर याला त्याच्या अल्पवयीन मुलीने मदत केल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे. हे सामूहिक हत्याकांड जमिनीच्या वादातून घडले आहे.
बंगळुरूचे पोलीस आयुक्त सीमांत कुमार सिंह यांनी याबाबत माहिती दिली. अल्पवयीन मुलीला हत्यांमध्ये सहभागी होण्यासाठी कसे तयार करण्यात आले आणि पीडितांना आरोपीपर्यंत आणण्यात तिची काय भूमिका होती, याचा तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
या गंभीर गुन्ह्यात अल्पवयीन मुलीचा कथित सहभाग चिंताजनक असल्याचे पोलीस आयुक्तांनी नमूद केले. आरोपीने मुलीचे ब्रेनवॉश कसे केले, तिला गुन्ह्यात मदत करण्यासाठी कसे तयार केले आणि तिच्याकडून नेमकी कोणती मदत घेतली, याची चौकशी केली जात आहे. या प्रकरणात मुलीला दुसरी आरोपी मानण्यात येत असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.
एकापाठोपाठ सात हत्या
पोलिसांच्या माहितीनुसार, इंदुशेखर याने सर्वप्रथम त्याची 40 वर्षीय पत्नी सुनीता हिची हत्या केली. त्यानंतर 65 वर्षीय सासू रूपावती हिचा जीव घेतला. पुढे त्याने 30 वर्षीय मेहुणा शिवकुमार, त्याची पत्नी दिव्या आणि त्यांचा सात वर्षांचा मुलगा पुनीत यांची हत्या केली. त्यानंतर दुसरा मेहुणा 40 वर्षीय शंकर आणि त्याची पत्नी नलिनी यांचीही हत्या केली. शंकर आणि नलिनी यांचा दहा वर्षांचा मुलगा मात्र या घटनेतून बचावला.
आरोपीने दिलेल्या जबाबानुसार, या हत्या एकाच दिवशी न होता 15 ते 20 दिवसांच्या कालावधीत करण्यात आल्या. हत्या घरात करण्यात आल्या की अन्य ठिकाणी, याचाही तपास पोलीस करत आहेत. सर्व पीडितांना आरोपीने वेगवेगळ्या वेळी बोलावून घेतल्याचा संशय आहे. त्यानंतर मृतदेह गोण्यांमध्ये भरून वेगवेगळ्या ठिकाणी फेकण्यात आल्याचा आरोप आहे.
अडीच कोटींच्या मालमत्तेचा वाद?
या हत्यांमागे श्रीरामपुरा येथील सुमारे अडीच कोटी रुपयांच्या मालमत्तेचा वाद असल्याचा संशय पोलिसांना आहे. ही मालमत्ता मृतांच्या नावावर असल्याने तिचा ताबा मिळवण्यासाठी आरोपीने हत्यांचा कट रचला असावा, असा तपास यंत्रणांचा अंदाज आहे.
नातेवाइकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इंदुशेखर याने काही कारण सांगून सासूकडून सहा स्टॅम्प पेपरवर सह्या करून घेतल्या होत्या. ही बाब पत्नी सुनीता हिला समजल्यानंतर तिने विरोध केला आणि सर्व स्टॅम्प पेपर परत घेतले होते. याच कारणावरून आरोपीच्या मनात पत्नी आणि तिच्या कुटुंबीयांविषयी नाराजी निर्माण झाली असावी, असा पोलिसांचा संशय आहे.
सीसीटीव्ही फुटेजमुळे तपासाला दिशा
पोलिसांच्या माहितीनुसार, पहिली हत्या 16 ऑक्टोबर रोजी झाली. आरोपीने मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतःच्या कारचा वापर केल्याचा आरोप आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी वाहनातून मृतदेह घेऊन जात असल्याचे दिसत असल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे.
चौकशीदरम्यान आरोपीने पत्नी आपल्याला वारंवार निकम्मा म्हणत टोमणे मारत असल्याचा दावा केला. त्यामुळे तो मानसिक तणावाखाली असल्याचे त्याने सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले. मात्र, हा दावा आणि मालमत्तेचा वाद या दोन्ही बाबींची स्वतंत्रपणे पडताळणी सुरू आहे.
16 ते 31 ऑक्टोबरदरम्यान आरोपीने नातेवाइकांना संदेश पाठवून कुटुंबीय फिरायला गेले असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला होता. नलिनीच्या आईने श्रीरामपुरा पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.
तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीचा मोबाइल ट्रॅक केला. त्याचे लोकेशन सतत बदलत असल्याचे आढळले. बेपत्ता कुटुंबीयांचे मोबाइलही त्याच ठिकाणी लोकेशन दाखवत असल्याने सुरुवातीला सर्वजण एकत्र प्रवास करत असल्याचा संशय होता. मात्र, पुढील तपासात पोलिसांना वेगळाच प्रकार असल्याचे लक्षात आले.
यानंतर पोलिसांनी आरोपीला चिक्कबळ्ळापूर जिल्ह्यातील नंदी हिल्स परिसरात नेऊन शोधमोहीम राबवली. तेथे सात वर्षीय पुनीतचा मृतदेह सापडला. अन्य मृतदेहांचा शोध अद्याप सुरू आहे.




