सामाजिक बांधिलकी ठेवून काम करा- विशाल शेवाळे
जनरल सेक्रेटरी डीसीएम सोसायटी ऑफ इंडिया),
(प्रतिनिधी,पुणे)
विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी ठेवून राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक म्हणून गावाच्या ग्राम स्वच्छतेचे, सामाजिक प्रबोधनाचे, आरोग्याचे, साक्षरतेचे, श्रमसंस्काराचे काम निस्वार्थपणे, प्रामाणिकपणे व उत्कृष्ट करावे, असे आव्हान डीसीएम सोसायटी ऑफ इंडियाचे जनरल सेक्रेटरी सन्माननीय विशाल शेवाळे यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे राष्ट्रीय सेवा योजना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाणिज्य व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे कला महाविद्यालय 896 नाना पेठ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे वाडेबोल्हाई पुणे येथे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी विशाल शेवाळे बोलत होते.
संस्थेचे अध्यक्ष डी टी रजपूत, जनरल सेक्रेटरी विशाल शेवाळे, खजिनदार सिद्धार्थ शेवाळे, प्रभारी प्राचार्य डॉ. प्रवीण कांबळे, उपप्राचार्य डॉ.नरेश पोटे, सरपंच वैशाली केसवड, उपसरपंच सोनाली रिकामे, ग्रामविकास अधिकारी संतोष भोसले, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे संचालक, प्राचार्य सतिश धुमाळ, पोमण सर, महाविद्यालयातील
डॉ.जे.के म्हस्के, डॉ तेजपाल कांबळे, प्रा.रणजित देशमुख, डॉ जयश्री कांबळे, डॉ.बाळासाहेब सोनवणे, कार्यालयीन अधीक्षक किशोर भुजबळ, प्रा अजय खुर्पे आदी उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे वाडेबोल्हाईचे प्रथम नागरिक सरपंच वैशाली केसवड म्हणाले की, महात्मा गांधींचा खेड्याकडे चला हा विचार घेऊन राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी आमच्या गावात भारत सरकार, महाराष्ट्र शासनाने, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना यांच्या ध्येय धोरणानुसार काम करावे. गावचे संपूर्ण सहकार्य असेल आमचे ग्रामस्थ प्रत्येक कामात योगदान देतील याची मी हमी देते.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.नरेश पोटे म्हणाले की,राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरामध्ये प्रबोधन व्याख्यानमाला आयोजित केली आहे. यामध्ये व्यक्तिमत्व विकास व करियर,महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक योगदान,आरोग्य जनजागृती मानसिक आरोग्याचे महत्व,छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे आरमार, शिवराज्याभिषेकाची 350 वर्ष, लिंगभाव संवेदनशीलता आणि आजचे युवक इत्यादी विषयावरती प्रबोधन व्याख्यानमाला आयोजित केली आहे विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी या व्याख्यानमालीचा लाभ घ्यावा. आमच्या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक सात दिवस शिस्तीमध्ये गावातील सर्व कामे प्रामाणिकपणे करतील.
राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी तथा प्रभारी प्राचार्य डॉ. प्रवीण कांबळे यांनी सांगितले की,भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आदेशानुसार स्वयंसेवकांनी ग्राम स्वच्छतेला जास्तीत जास्त महत्व द्यावे. स्वयंसेवकांनी वाडेबोल्हाई गावातील सर्व मंदिराचा, शाळेचा परिसर, गावाचा परिसर स्वच्छ करून स्वच्छतेचा संदेश द्यावा व ग्रामस्थांवरती श्रमसंस्कार घडवण्यासाठी प्रयत्न करावेत. लेक वाचवा, पाणी वाचवा, बळीराजा वाचवा, वसुंधरा वाचवा असे आव्हान केले.