पारंपारिक फुगडीने श्री राम नवमी यात्रा महोत्सवाची दिमाखात सांगता

राजेश वरटकर
सेलु: तालुक्यातील दुसरे पंढरपुर म्हणुन नावारूपाला आलेले
श्री संत केजाजी महाराज संस्थान, श्री क्षेत्र घोराड येथे दहा दिवस चाललेल्या श्री राम नवमी यात्रा महोत्सवाची पारंपारिक फुगडीने उत्साहात सांगता करण्यात आली. गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत दररोज रामकथेचे आयोजन करण्यात आले होते.या यात्रा महोत्सव निमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती, तसेच विविध प्रकारचे आकाश पाळणे तसेच विविध प्रकारच्या खेळण्याची दुकाने, पुजा साहित्याचे दुकाने तसेच लहान मुलांसाठी लागलेली झुले यामुळे पाच दिवस चाललेल्या या यात्रा महोत्सवात विदर्भातील लाखो भाविकांनी हजेरी लावली होती यामुळे दहा दिवस संत नगरीत भक्तीचा सुगंध दरवळला होता.
श्री रामनवमीच्या दिवशी गुरुवारी रामजन्मानिमित्त सकाळी अकरा ते दुपारी एक कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते दुपारी बारा वाजता रामजन्म पार पडला यावेळी गुलालाची उधळण तसेच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली यानंतर प्रसाद वितरण करण्यात आला.याच दिवशी रात्री दोनशे वर्षे पुरातन लाकडी रथावरून टाळ- मृदंग व भजनी मंडळ तसेच विविध देखावे काढुनी हनुमंताची भव्य शोभायात्रा काढण्यात आली, ज्यामध्ये भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला पहाटे पाच वाजता रथयात्रा मंदिर परिसरात आल्यावर विविध रंगबिरंगी फटाक्यांची आतिषबाजी तसेच गुलालाची उधळण करण्याची परंपरा आजही कायम असुन हा सोहळा याची देही याची डोळा बघण्यासाठी भाविकांची मोठी उपस्थिती होती.
शुक्रवारी दुपारी बारा ते तिन काल्याचे कीर्तन, दहीहंडी व महाप्रसाद कार्यक्रम पार पडला. रविवारी एकादशी निमित्त श्री संत केजाजी महाराजांची पालखी मिरवणूक काढण्यात आली तसेच रात्री जागर-भजनाचा कार्यक्रम झाला. सोमवार द्वादशीला पहाटे श्री संत केजाजी महाराज समाधीचे पूजन, अर्चन, अभिषेक, प्रक्षाळ पूजन व खिरापत वाटपानंतर महाप्रसाद देण्यात आला.
दुपारी बारा ते तीन या वेळेत पारंपारिक फुगडी खेळण्याची परंपरा पार पाडण्यात आली यावेळी भजन मंडळाच्या वतीने फु बाई फु, फुगडी फु,तु राधे राधे बोल रे,तु कान्हा कान्हा बोल रे, भारत का बच्चा बच्चा श्री राम बोलेगा,राम नामाचा गजर, कृष्ण नामाचा गजर करीत श्री संत केजाजी महाराज की जय च्या उद्घोषात फुगडी खेळण्याच्या परंपरेला सुरुवात झाली.यावेळी लहान चिमुकल्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता तसेच तरुणाई सोबत वृद्ध महीलांची श्री संत केजाजी महाराज दरबारात फुगडी खेळण्याची धडपड बघता दर्शन घेण्यासाठी येणा-या भक्तांनी आनंद व्यक्त केला.यावेळी बाहेर गावावरून आलेल्या महिला भक्तांनाही फुगडी खेळण्याचा मोह आवरला नाही आणि त्यांनी ही संत दरबारात फुगडी खेळण्याची इच्छा पुर्ण करुन आनंद साजरा केला.ही परंपरा श्री संत केजाजी महाराजांच्या काळापासुन चालत आलेली असुन आजही ती जपली जात आहे. फुगडीनंतर श्री राम नवमी यात्रा महोत्सवाची दिमाखात सांगता झाली.
या महोत्सवानिमित्त विदर्भातील लाखो भाविकांनी श्री क्षेत्र घोराड येथे मोठी गर्दी केली होती. श्री संत केजाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होत भक्तांनी संत नगरीत भक्तीचा अनोखा सोहळा अनुभवला.



