संजय यादव यांचा मृत्यु कार मध्ये जळून झाला नाही तर त्यांची हत्या करून जाळण्यात आले
गाझियाबाद ( युपी ) नवप्रहार डेस्क
येथील प्रॉपर्टी डीलर संजय यादव हे कार मध्ये जळून मृत्युमुखी पडले नाही तर त्यांची हत्या करून त्यांना कार मध्ये टाकून कार ला आग लावण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.
पोलीस तपासात संजय यादव यांची त्यांचेच दोन मित्र विशाल आणि जीत यांनी दाबून हत्या केल्याचं उघड झालं आहे. बिअर पार्टी केल्यानंतर डॉग कॉलरचा वापर करत त्यांनी हत्या केली.
पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. तपासात उघड झालं आहे की, त्यांनी संजय यादव यांच्या अंगावरील दागिने लुटले. यानंतर त्यांनी मृतदेह एसयुव्हीत ठेवला आणि आग लावली. सोमवारी रात्री आगीत जळून खाक झालेल एसयुव्ही सापडली होती. यानंतर कारमधील मृतदेह संजय यादव यांचा असल्याची ओळख पटली होती.
पोलिसांनी सांगितलं की, संजय यादव यांच्या कुटुंबीयांनी ते आपले मित्र विशाल राजपूत आणि जीत चौधरी यांना भेटायला गेल्याची माहिती दिली होती. त्यांनीच संजय यादव यांची हत्या केली असावी असा संशय़ही त्यांनी व्यक्त केला होता. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींना आपल्या ताब्यात घेतलं होतं.
चौकशी केली असताना विशाल आणि जीत यांनी संजय यादव यांची हत्या केल्याची आणि त्यांच्या अंगावरील दागिने लुटल्याची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितलं. आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, संजय यादव सोमवारी संध्याकाळी त्यांना भेटण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी बिअर प्यायली होती. यानंतर डॉग कॉलरच्या मदतीने संजय यादव यांची गळा दाबून हत्या करत दागिने लुटण्यात आले. आरोपींनी संजय यादव यांचा मृतदेह रिअर सीटवर ठेवला आणि पेट्रोलच्या सहाय्याने एसयुव्ही पेटवली. एसयुव्हीला आग लावताना जीत हलकासा भाजला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी आरोपींकडून रोख रक्कम, सोन्याच्या अंगठ्या, ब्रेसलेट आणि साखळी सापडली आहे. दरम्यान हत्येसाठी वापरण्यात आलेली डॉग कॉलरही पोलिसांना सापडली आहे. “विशाल राजपूत आणि जीत चौधरी यांनी त्याला (संजय यादव) दारूच्या नशेत आणलं. यानंतर त्यांनी कुत्र्याच्या कॉलरने त्याचा गळा दाबला. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ते एका निर्जन भागात गेले. त्यानंतर त्यांनी मृतदेहासह एसयूव्हीला आग लावली. आरोपींनी तुरुंगात पाठवण्यात आले असून पुढील चौकशी सुरू आहे,” असं ग्रेटर नोएडाचे अतिरिक्त डीसीपी अशोक कुमार यांनी सांगितलं. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.