वेतन रखडल्याने कर्मचारी तणावात.

सीईओंना साकडे; आंदोलनाचा दिला इशारा,
शरद शेंडे
भंडारा प्रतिनिधी
आरोग्य सेवा ही अत्यावश्यक सेवेत मोडते. दरम्यान जनतेचे आरोग्य निरोगी आणि स्वस्थ्य ठेवण्यासाठी कार्यरत आरोग्य सेवक, पर्यवेक्षक आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या वेतनात अनयिमतता असल्याने त्यांना आर्थिक आणि मानसिक मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. या समस्येवर लक्ष वेधण्यासाठी भंडारा जिल्हा राष्ट्रसेवा आरोग्य कर्मचारी संघटनेने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी मिलिंद साळवे यांच्या कार्यालयात धाव घेत निवेदन सोपवून कर्मचाऱ्यांना नियमित आणि वेळेवर वेतन देण्याची मागणी केली आहे.
..
जिल्ह्यात 1400 आरोग्य कर्मचारी :
भंडारा जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागांत काम करणाऱ्या आरोग्य सेवक, सहाय्यक, कनिष्ठ व वरिष्ठ लिपिक, परिचर अशा सुमारे 1400 आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हे लोक कठोर परिश्रम करून जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा देत आहेत. मात्र, शासनाकडून वेतन वेळेवर न मिळाल्यामुळे त्यांचे आर्थिक जीवन अत्यंत अस्थिर झाले आहे. अनेक कर्मचाऱ्यांना दोन ते तीन महिन्यांपर्यंत वेतन मिळालेले नसल्याने आर्थिक ताण वाढला आहे. त्यामुळे मनस्ताप आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
.
संघटनेची भूमिका : आरोग्य कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित आणि वेळेवर देणे गरजेचे आहे. विलंबामुळे कर्मचारी मानसिकदृष्ट्या प्रभावित होत आहेत आणि कामावरही त्याचा परिणाम होत आहे. वेतनाच्या विलंबामुळे आरोग्य सेवेच्या दर्जावरही परिणाम होऊ शकतो.
..
वेतन तरतूद असली तरी विलंब का ?
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासनाकडून ठोस निधीची तरतूद केलेली असते. पण या निधीचे वितरण आणि वेतन देण्याची प्रक्रिया जिल्हा परिषदेकडे सोपवली जाते. मात्र, या विभागातील काही अधिकारी आणि कर्मचारी हलगर्जीपणा दाखवित असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. या कारणाने वेतन देण्यात दोन-तीन महिन्यांचा विलंब होत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो.
..
आंदोलनाचा इशारा….!
शासन आणि प्रशासन यांनी या समस्येवर तातडीने उपाययोजना केली नाही, तर आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. दर महिन्याला वेतन वेळेवर मिळावे. आरोग्य
सेवकांचे वेतन नियमित देण्यास नकार दिल्यास, आंदोलनाच्या मार्गावर जावे लागेल, असेही संघटनेने स्पष्ट केले आहे. अशा परिस्थितीत शासन व प्रशासनांनी याकडे गंभीरपणे लक्ष देऊन वेतन देण्याच्या प्रक्रियेत सुधारणा करावी. अशी मागणी आरोग्य कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जनबंधू, सचिव भोंदे, जिल्हा उपाध्यक्ष भोयर यांनी केली आहे.
वेतन विलंबामुळे आर्थिक कोंडी….!आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी अनेकांनी कर्ज घेतलेले आहे. शैक्षणिक कर्ज, घर बांधणीसाठी बँक व पतसंस्थांकडून विविध कर्जे घेतलेली आहेत. परंतु वेतन वेळेवर न मिळाल्यामुळे कर्ज हप्ते भरणे कठीण झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून कर्मचाऱ्यांना जास्त व्याज भरणे भाग पडते, ज्यामुळे त्यांचे आर्थिक संकट अधिकच वाढले आहे. कुटुंबाचे भरणपोषण, मुलांचे शिक्षण, दैनंदिन गरजा यासाठी आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.