क्राइम
मुंबईच्या भोंदूबाबा ची नागपुरात पुनरावृत्ती हरवलेल्या पतीचा शोध लावून देण्याच्या नावाखाली केले लैंगिक शोषण

नागपूर /विशेष प्रतिनिधी
नाशिक मधील अशोक खरात, ऋषिकेश वैध, नवी मुंबई मधील अब्दुल रशीद उर्फ बाबजान यांचे कृष्णकृत्य ताजे असतानाच नागपूर मधून अशीच एक हादरविणारी घटना समोर आलीं आहे. हरवलेल्या पतीचा शोध लावून देण्याचे आमिष दाखवत एका तथाकथित मांत्रिकाने विवाहितेवर लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सक्करदरा पोलिसांनी ६५ वर्षीय आरोपी ताहीर रशीद बेग याला अटक केली असून, त्याच्याकडून आणखी किती महिलांची फसवणूक झाली आहे, याचा तपास सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित ३६ वर्षीय महिला नागपुरात घरकाम करून उदरनिर्वाह करते. १५ ऑक्टोबर २०२५ रोजी तिचा पती अचानक कोणालाही न सांगता घरातून निघून गेला होता. त्यामुळे ती मानसिकदृष्ट्या खूपच खचली होती. या परिस्थितीचा गैरफायदा घेत आरोपी ताहीर बेग याने स्वतःला मांत्रिक असल्याचे भासवून तिचा विश्वास संपादन केला.
एका कार्यक्रमादरम्यान आरोपीची पीडितेशी ओळख झाली. त्याने जादूटोणा आणि विशेष पूजा करून तिचा हरवलेला पती परत आणू शकतो, असा दावा केला. सुरुवातीला पीडितेचा विश्वास बसावा म्हणून विविध पूजा आणि विधी करण्यास सांगण्यात आले. काही दिवसांनी आरोपीने ‘विशेष पूजा’ करण्याच्या बहाण्याने तिला एकांतात बोलावले. यावेळी आरोपीने पीडितेच्या नातेवाईकांना बाहेर पाठवून तिला धमकावले आणि तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. इतकेच नव्हे, तर त्यानंतर आरोपीने तिच्या घरी जाऊनही हा प्रकार पुन्हा केल्याचे तपासात समोर आले आहे.
या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. आरोपीचा शोध घेत अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव परिसरातून त्याला अटक करण्यात आली. या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांनी सांगितले की, “पीडितेच्या तक्रारीनंतर त्वरीत कारवाई करत आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याने यापूर्वीही अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचा सखोल तपास सुरू आहे.”
दरम्यान, या घटनेमुळे नागपूर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन अशा भोंदू व्यक्तींवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. तसेच, अशा प्रकारच्या फसवणूक आणि अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी नागरिकांनी जागरूक राहण्याची गरज असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे




