शाशकीय
तुमसर पंचायत समिती प्रभाऱ्यांच्या भरोसे !
खंड विकास अधिकारी… ग्राम विकास अधिकारी, अन् ग्रामसेवकही प्रभारी!”
ग्राम विकास अधिकाऱ्यांची ७ तर ग्रामसेवकांची १६ पदे रिक्त
तुमसर तालुक्यातील गाव खेड्याचा विकास कसा होणार ?
रिक्त पदांचा अनुशेष वाढला
कर्मचाऱ्यांच्या भरती बंदचा फटका
एका ग्रामसेवकाकडे तीन ते चार ग्रामपंचायतीचा कारभार
भंडारा /चंद्रकांत श्रिकोंडवाऱ
तालुक्याच्या विकासाची चाबी अशी पंचायत समितीची ओळख आहे. ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू असलेल्या तुमसर पंचायत समितीचा कारोभार प्रभारी अधिकाऱ्याच्या भरवश्यावर चालत असल्याने तहसीलचा विकास खुंटला आहे. अतिरिक्त कामा मुळे कर्मचारी कामाच्या ओझ्याखाली दबल्या जात असल्याने कर्मचाऱ्यांची मांनसिक अवस्था बिकट होत चालली आहे. तुमसर तालुक्यात खंड विकास अधिकाऱ्यांसह १६ ग्रामसेवक व ७ ग्रामविकास अधिकारी प्रभारी असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. तालुक्यातील गावखेड्यांचा विकास कसा होणार असा प्रश्न येथे उपस्थित होत असून एका ग्रामसेवकाकडे तीन ते चार गावांचा प्रभार देण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा जीवही मेटाकुटीस आला आहे.
भंडारा जिल्ह्यात तुमसर तालुका हा क्रमांक दोनचा तालुका असून येथे ९७ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी १६ ग्रामपंचायतीत ग्रामसेवकांची पदे रिक्त असून ७ ग्रामविकास अधिकाऱ्यांचे पदेही रिक्त आहेत. त्यामुळे एका ग्रामसेवकाला तीन ते चार गावांचा प्रभार देण्यात आला असून ग्राम विकास अधिकाऱ्यांना येथे प्रभार देण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गावाकडच्या विकासात ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांचे मोठे महत्त्व आहे कामाच्या व्याप वाढला आहे परंतु रिक्त पदे अजून पर्यंत शासनाने भरण्याकरिता येते प्रयत्न केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे येथील ग्राम विकास अधिकारी व ग्रामसेवकावर अतिरिक्त कामाच्या तान पडत असून त्याच्या परिणाम गाव विकासावर ही होत आहे ग्रामसेवकांना व ग्रामविकास अधिकाऱ्यांना एका गावावरून दुसऱ्या गावाला जावे लागते ऑनलाइन ची कामे वाढली असल्याने तात्काळ कामही करावी लागतात त्यामुळे त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
येथे ग्रामविकास अधिकारी पद रिक्त: तुमसर तालुक्यातील मोठ्या गावात सात ग्राम विकास अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत त्यात सिहोरा,डोंगरी बू.,आष्टी, चुल्हाड, नाकाडोंगरी, लोभीव सीतासावंगी या गावांचा समावेश आहे.
ग्रामसेवक पद महालगाव, सुकळी (न.)/ देवरीदेव, गोंदे खारी/गोंडीटोला, हरदोली, बपेरा (आंबागड), सोंड्या/वारपिंडकेपार, धुटेरा, मोहगाव खदान, खैरलांजी, आसलपाणी, चांदपूर, सिंदपुरी, सिलेगाव, साखळी कर्कापूर, पांजरा, रेंगे पार, रोंघा,बोरी, बपेरा(सि.) या गावांचा त्यात समावेश आहे.
खंड विकास अधिकारी पद प्रभारी: तुमसर येथे मागील चार महिन्यापासून खंडविकास अधिकारी यांचे पद रिक्त असून भंडारा येथील खंडविकास अधिकारी माणिक चव्हाण यांच्याकडे तुमसरचा प्रभार देण्यात आला आहे. ते आठवड्यातून येथे केवळ एक दिवस येतात तालुक्यातील नागरिकांना खंडविकास अधिकारी नेमक्या कोणत्या दिवशी येतात याची साधी माहिती नाही त्यामुळे अनेकांना आठवडाभर त्यांची प्रतीक्षा करावी लागते.अशी माहिती सरपंच संघटनेचे अध्यक्ष देवेंद्र मेश्राम यांनी दिली. येथील खंड विकास अधिकारी उमेश नंदा गवळी यांचे स्थानांतरण भंडारा येथे झाले तेव्हापासून सदर पद रिक्त आहे त्यापूर्वी तुमसर येथील खंडविकास अधिकारी हे जास्तीत जास्त वेळ प्रभारीच राहिले आहेत नियमित खंडविकास अधिकारी येथे कमीच आले आहेत.
रिक्त पदांचा अनुशेष: तालुक्याचे मिनी मंत्रालय म्हणून पंचायत समितीला म्हटले जाते परंतु येथे गाव विकासाचा महत्त्वपूर्ण कणा म्हणून ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी यांना मानले जाते परंतु त्यांचे पद मागील अनेक महिन्यापासून रिक्त आहेत त्या पदांच्या अनुशेष येथे वाढला आहे त्यामुळे गाव खेड्यांच्या विकास येथे रखडला आहे शासनाने सदर पदे तात्काळ भरण्याची गरज आहे.
तुमसर येथील खंडविकास अधिकारी हे प्रभारी असून येथे सात ग्रामविकास अधिकारी व १६ ग्रामसेवकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे या रिक्त पदावर कार्यरत असलेल्या ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त प्रभार देण्यात आला आहे. काही ग्रामपंचायती तीन ते चार महिने ग्रामसेवकच उपलब्ध नव्हते. शासनाने सदर पदे तात्काळ भरावी. नंदू राहंगडाले सभापती, पंचायत समिती, तुमसर