महात्मा फुले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिन संपन्न
हिवरखेड, ( मोर्शी) / प्रतिनिधी
*महात्मा फुले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात* ६ डिसेंबर रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या श्रीमती दातीर मॅडम, प्रमुख उपस्थिती सौ. नंदा थोरात , पर्यवेक्षिका, प्रमुख पाहुणे प्रा .सुभाष पारीसे तसेच प्रा. अमोल इंगळे हे उपस्थित होते. सर्वप्रथम पाहुणे मंडळींच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले . नंतर डॉ. बाबासाहेब यांच्या जीवन कार्यावर शाळेतील बरेच विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडलेत . प्रा. पारीसे यांनी बाबासाहेबांनी शालेय जीवनातील कठीण समस्यांवर यशस्वीपणे केलेली मात, प्रचंड वाचनाची सवय , स्वतः वरील आत्मविश्वास, कर्तृत्वावर असीम श्रद्धा यामुळे ते राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न , विश्वरत्न बनले यांबाबत विचार पटवून दिलेत. प्रा. इंगळे सरांनी बाबासाहेबांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून देतांना तुमच्याकडे दोन रुपये असतील एक रुपयाची भाकरी आणि एक रुपयाचे पुस्तक घ्या, यामुळे तुम्हाला शरीराची भूक आणि चांगल्या विचाराची भूक सहज भागवता येईल हे पटवून दिले. सौ थोरात यांनी बाबासाहेबांचा *शिका, संघटित व्हा व संघर्ष करा* हा मानव विकासाचा खरा मूलमंत्र पटवून दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती दातीर मॅडम यांनी डॉ. बाबासाहेबांचे विचार आजच्या पिढीने समजून घेवून आत्मसात करणे गरजेचे आहे , यातूनच समाजात समानता आपणास निर्माण करता येते हे समजावून सांगितले. या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन सौ. संगीता सरदार यांनी केले. या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.