कौर्याची परिसीमा ; हत्या करून चेहऱ्याचे मास ओरबडून खाल्ले
पाली (राजस्थान ) / नवप्रहार न्यूज नेटवर्क
देशात खुनाच्या एका मागून एक अनेक घटना घडत असतात. काही दिवसांपूर्वी दिल्लीत आफताब नावाच्या प्रियकराने श्रद्धा वालकर नावाच्या प्रेयसीचा खून करून तिच्या मृतदेहाचे 36 तुकडे करून ते फ्रीज मध्ये ठेवून नंतर त्याची विल्हेवाट लावली होती. त्याच धर्तीवर देशात अनेक प्रकार घडले. पण राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील सरधना गावाच्या जंगलात कौर्याची परिसीमा गाठणारे प्रकरण घडले आहे.
एवढंच नाही तर हत्येतील आरोपीनी मृत महिलेच्या तोंडाचं मांसही ओरबडून खाल्लं. या कृत्यानंतर त्या तरुणाचा चेहरा रक्ताने लाल झाला होता. घटनेनंतर पळून जाणाऱ्या तरुणाला गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. रिपोर्टनुसार, नेहमीप्रमाणे सारधना गावात राहणारी एक वृद्ध महिला शांती देवी शेळ्या चारण्यासाठी जंगलात गेली होती.
यादरम्यान तरुणाने जंगलात मोठ्या दगडाने महिलेवर हल्ला करून तिचं डोकं फोडलं. अनेकवेळा दगडांनी वार केल्यानं महिलेचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी तरुणाने मृत महिलेच्या चेहऱ्यावरील मांस खाल्लं. यानंतर आरोपी तरुणाने स्वतःचा शर्ट काढून मृत वृद्ध महिलेचा चेहरा झाकला.
जंगलात शेळ्या चारत असलेल्या लोकांनी हे दृश्य पाहिल्यानंतर त्यांनी याची माहिती गावकऱ्यांना दिली. हे पाहून आरोपी पळून गेला. गावकऱ्यांनी सुमारे एक किलोमीटर पाठलाग करून त्याला पकडून सेंद्रा पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपी तरुणाला पकडून पोलीस ठाण्यात आणलं.
त्या तरुणाने दाताने महिलेच्या तोंडाचं मांस ओरबडून खाल्ल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलीस तपासात या तरुणाचं नाव सुरेंद्र असून तो मुंबईचा रहिवासी आहे, असं समोर आलं आहे. 24 वर्षीय तरुणाला ड्रग्जचं व्यसन आहे. वृद्ध महिलेच्या हत्येनंतर ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी मृतदेह सेंद्रा रुग्णालयाच्या शवागारात ठेवला आहे. वृद्ध महिलेची निर्घृण हत्या का करण्यात आली? आणि मुंबईतील तरुण जंगलात काय करायला आला होता? याबाबत पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत.