पुसदमध्ये दहा लाखाचा अवैध रासायनिक खत साठा जप्त
◆कृषी विभागाची मोठी कार्यवाही; बोगस खताचे गुजरात कनेक्शन उघड
राजेश सोनुने पुसद तालुका प्रतिनिधी
पुसद ता.प्र.-/ एकिकडे संकटांमुळे शेतकरी देशोधडीस गेला असतांना पुसद शहरातील शंकर नगरस्थित एका गोदामातून तब्बल दहा लाख चोवीस हजार तीनशे साठ रुपयांचा विविध कंपन्यांचा अवैध रासायनिक खत साठा कृषी विभागाच्या पथकाने धाड टाकून जप्त केला.
सदर घटनेची फिर्याद तालुका कृषी अधिकारी विजय तुकाराम मुकाडे यांनी शहर पो स्टे येथे दिली. दि.30 ऑगस्ट रोजीच्या मध्यरात्रीपासून ते 31 ऑगस्ट रोजी दरम्यान करण्यात आलेल्या कार्यवाहीत दहा लाखांच्या अवैध रासायनिक खत साठ्याचे गुजरात कनेक्शन असल्याचे उघड झाले आहे.
गजानन सुरोशे रा.शंकरनगर असे अवैध रासायनिक खत साठा साठविणाऱ्या साठा बहादराचे नाव आहे.
जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी राजीव माळीद यांचे नैत्रुत्वात पुसद-महागाव प.स.चे कृषिअधिकारी शंकर राठोड,,अतुलकुमार कदम, धड सत्रातील पंच ग्रामसेवक भारत गरड, पंडित भिसे यांचे समवेत शंकरनगर स्थित गजानन सुरोशे यांचे घरी पाडलेल्या छाप्यात अपेक्स गोल्ड पावडर 50 किलो पॅकिंगच्या बॅगमध्ये कॅल्शियम सल्फेट डीहायड्रेट व सल्फर 13 टक्के या 78 बॅग किंमत 61,620, अपेक्स दाणेदार उदरक फॉस्पेट सोल्युबलायझिंग फंगल बायो फरटीलायझर स्पोअर काउट या प्रति बॅग 1150 रुपये किमतीच्या 80 बॅग एकूण किंमत 92000, नवरत्न पोटॅशच्या 500 बॅग एकूण किंमत 6 लाख 25 हजार, अपेक्स सुपर सिलिकॉनच्या 97 बॅग एकूण किंमत 1 लाख 13 हजार 490 रुपये व अन्य कंपन्यांच्या शेकडो कृषी साहित्य खतांच्या बॅग्स छाप्या दरम्यान जप्त करण्यात आल्या.
तालुका कृषी अधिकारी विजय मुकाडे यांचे तक्रारी वरून गजानन माधव सुरोशे यांचे विरुद्ध शासनासह शेतकऱ्यांची नियोजित फसवणूक केल्याच्या गुन्ह्यासह रासायनिक अधिनियम कायदा 1985 सह,रासायनिक खत आदेश 1955 व अन्य कलमान्वये कार्येवाही करण्यात आली.
सदर आवैध खत साठ्यावर छापा टाकला असता त्यात गुजरात येथील रासायनिक खत कम्पनी मधून खतांचा अवैध पुरवठा करण्यात येत असल्याची कबुली सुरोशे यांनी कृषी व पोलीस विभागास दिल्याचे कळते. एकंदरीत राज्यातील शेतकऱ्यांची प्रतारणा करण्यासाठी अवैध खत साठा पुरविणाऱ्या गुजरात कारखान्यावर शहर पोलीस स्टेशन व कृषी विभागाच्या वतीने कार्येवाही करणे अपेक्षित असल्याचे जनसामान्यांतुन बोलल्या जात आहे.