सामूहिक बलात्कार प्रकरणातील साक्षीदार पतीला डिझेल टाकून जाळले

मैनपुरी / नवप्रहार ब्युरो
पत्नीचे अपहरण करून तिच्यावर करण्यात आलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात मुख्य साक्षीदार असलेल्या पतीला डिझेल टाकून जाळण्यात आल्याची घटना मैनपुरीच्या बिछवान पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. अर्धवट जळालेला मृतदेह पोलिसांनी शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. नातेवाइंकानी कपड्यावरून मृतदेहाची ओळख पटवली आहे. घटना उघडकीस आल्यावर परिसरात खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण मैनपुरीच्या बिछवान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. नुकताच एका शेतात अर्धा जळालेला मृतदेह सापडला होता. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला असता, तो 40 वर्षीय साजिदचा असल्याचे समजले. कुटुंबीयांनी कपड्यांवरून साजिदचा मृतदेह ओळखला. काही काळापूर्वीच साजिदच्या पत्नीचे अपहरण करुन तिला चार महिने ओलीस ठेवण्यात आले होते. यादरम्यान, तिच्यावर अनेकदा सामूहिक बलात्कारही झाला. या खटल्यात साजिद हा साक्षीदार होता.
मृताच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, मुख्य आरोपी भोला प्रधान आणि त्याच्या मुलांनी साजिदवर तडजोडीसाठी दबाव टाकला होता. कोर्टात साक्ष न देण्यासाठी सातत्याने साजिदला धमक्या मिळत होत्या. अनेकवेळा त्याला मारहाणही केली. साजिदने न ऐकल्याने शेवटी त्याला जिवंत जाळले. याप्रकरणी मैनपुरी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.