आणखी एका बाबाचा कारनामा उघड

सुरत जवळील कामरेज तालुका आहे. येथील पारडी गावात ‘श्री सत्य योग फाउंडेशन’ या आश्रमात हे असत्याचे प्रयोग सुरू होते. बाहेरून धर्माचे पांघरूण घेऊन आत नकली नोटांचा गोरखधंदा सुरू होता. देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचे पाप या आश्रमातून सुरू होते.
500 रुपये द्या आणि तीनपट अधिक नोटा मिळवा
या नोटा सुरत येथील वराछा या परिसरात छापल्याचे समोर आले. या नोटा बाजारात चालवण्यासाठी खास योजना आखण्यात आली होती. त्यानुसार खरी 500 रुपयांची नोट द्या आणि 1500 रुपयांच्या नकली नोटा मिळवा अशी स्कीम होती. या भामट्यांनी 66 लाख खऱ्या नोटांच्या बदल्यात 2 कोटी रुपयांच्या खोट्या नोटा बाजारात आणण्याची योजना आखली होती. पण त्यापूर्वीच त्यांचा भांडाफोड झाला.
आश्रमात नोटांचा छापखाना
पोलिसांनी संबंधित आश्रमात छापा टाकला. तिथे प्रिंटिंग मशीन, संगणक, खास कागद, रंग आणि काही महत्त्वाची कागदपत्रं त्यांच्या हाती लागली. आश्रमातील वाहनांचा वापरही या नकली नोटांच्या रॅकेटसाठी करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. पंचनामा दरम्यान पोलिसांनी 40 हजारांहून अधिक नकली नोटा जप्त केल्या. या नकली नोटांचे रॅकेटचे देशभरात कनेक्शन असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी त्यासाठी तपासाची व्याप्ती वाढवली आहे.




