क्राइम
शिक्षिका 9 वर्षाच्या विद्यार्थिनीला स्वतःच्या घरी घेऊन गेली ; संचालकाने केला विद्यार्थिनीवर बलात्कार

शिक्षिकेला अटक, संचालक फरार
रामगड (दुमका) / विशेष प्रतिनिधी
ती एका संस्थेत शिक्षिका म्हणून कार्यरत होती. नऊ वर्षाच्या विद्यार्थिनीला स्वतःच्या घरी घेऊन गेली. तिथे संस्थेचा संचालक आला. त्याने त्या दोघींना आपल्या कार मध्ये बसवले आणि तो त्यांना स्वतःच्या घरी घेऊन गेला. शिक्षिका आणि संचालकाने तिच्या समोरच शारीरिक संबंध ठेवले.त्यानंतर तो त्या चिमुकलीला अन्य खोलीत घेऊन गेला. तेथे संचालकाने तिच्यावर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाब टाकला.पण तिने नकार दिला. परंतु त्याने तिच्यासोबत जबरदस्ती गैरकृत्य केले.
या प्रकरणी पोलिसांनी महिला शिक्षिकेसह शाळेच्या संचालकाविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी आरोपी महिला शिक्षिकेला अटक केली आहे. तर आरोपी संचालक फरार आहे. निली अनिका टुडू असं अटक केलेल्या आरोपी शिक्षिकेचं नाव आहे. पोलिसांनी तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे, तर मुख्य आरोपी असलेला शाळेचा संचालक फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. ही घटना उघडकीस आल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी शाळेबाहेर आणि पोलीस ठाण्यावर धाव घेत तीव्र आंदोलन केलं.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना झारखंड राज्यातील दुमका जिल्ह्यातील रामगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. येथील एका खासगी शाळेतील शिक्षिका आणि संचालकाने हा अमानुष प्रकार केला आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी रामगड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, २४ नोव्हेंबर रोजी शाळेतील शिक्षिका निली अनिका टुडू हिने ९ वर्षीय विद्यार्थिनीला फूस लावून दुमका येथील सरुवा दुधानी परिसरातील आपल्या घरी नेले.
सायंकाळी शिक्षिकेने याबाबतची माहिती शाळेचा संचालक आणि मुख्याध्यापक एमानुएल मुर्मू याला दिली. त्यानंतर संचालक आपली कार घेऊन तिथे आला. त्याने आपल्या कारमधून शिक्षिका आणि मुलीला घेऊन डोंगर परिसरातील आपल्या घरी घेऊन गेला. तक्रारीत नमूद केल्यानुसार, शिक्षिका आणि संचालक यांचे आधीपासूनच प्रेमसंबंध होते. संचालकाने चिमुरडीसमोर शिक्षिकेशी शारीरिक संबंध ठेवले आणि त्यानंतर चिमुरडीलाही तसेच करण्यास सांगितलं. घाबरलेल्या मुलीनं असं करण्यास विरोध केला. मात्र तरीही आरोपीने तिच्यासोबत गैरकृत्य केलं. त्यानंतर शिक्षिका त्या मुलीला दुसऱ्या खोलीत घेऊन गेली.
दोन दिवसांनी मुलीने घरी सांगितला प्रकार; शिक्षिका तुरुंगात, संचालकाचा शोध सुरू
या भयानक प्रकारानंतर दोन दिवसांनी पीडित मुलीने आपल्या कुटुंबीयांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. हे ऐकून हादरलेल्या मुलीच्या वडिलांनी तत्काळ रामगड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. दुसरीकडे, ही घटना गावात वाऱ्यासारखी पसरताच ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी शाळेत धाव घेत व्यवस्थापनाविरोधात तीव्र निदर्शने केली आणि त्यानंतर रामगड पोलीस ठाण्यात जाऊन आरोपींच्या तात्काळ अटकेची मागणी लावून धरली.
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी गुन्हा नोंदवत कारवाई सुरू केली. आरोपी शिक्षिका निली अनिका टुडू हिला अटक करून दुमका येथील विशेष पॉक्सो (POCSO) न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तिला न्यायालयीन कोठडी सुनावली असून तिची रवानगी दुमका मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. दरम्यान, फरार संचालक एमानुएल मुर्मू याला अटक करण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. पोलीस घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.



