क्राइम

महिला टेलिव्हिजन अँकर ची गोळ्या झाडून हत्या 

Spread the love

कराची / नवप्रहार डेस्क

              पाकिस्तान च्या कराची मधून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. कराची येथील प्रसिद्ध टेलिव्हिजन अँकर राबिया अहसान यांची त्यांच्याच राहत्या घरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. रावळपिंडीतील गुलशनाबाद भागात रविवारी ही घटना घडली.

या हत्येनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत राबिया यांच्या पतीला ताब्यात घेतले असून प्राथमिक चौकशीत पतीने स्वतः हत्येची कबुली दिल्याची माहिती स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिली आहे.

पाकिस्तानी मीडिया आऊटलेट ‘समा’ (Samaa) च्या वृत्तानुसार, राबिया यांचे पती अहसान ताहिर खान याने पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत गोळीबार केल्याचे मान्य केले. मात्र, ‘डॉन’ने दिलेल्या वृत्तानुसार, चौकशीदरम्यान खानने हा केवळ एक अपघात असल्याचा दावा केला आहे. पिस्तूल साफ करत असताना अचानक ट्रिगर दाबला गेला आणि चुकून गोळी सुटली, तसेच पिस्तूल लोड केलेली आहे याची आपल्याला अजिबात कल्पना नव्हती, असा बचाव आरोपी पतीने केला आहे.

घटनेच्या वेळी घरात उपस्थित असलेल्या एका पुरुष घरकामगारानेही पोलिसांना सांगितले की, गोळी सुटल्यानंतर खानने त्यालाही ही घटना चुकून घडल्याचे सांगितले होते. पोलिसांनी घटनास्थळावरून गुन्ह्यात वापरण्यात आलेले संशयित पिस्तूल जप्त केले असून पुढील बॅलिस्टिक तपास सुरू आहे.

अंगणात खेळत होत्या निष्पाप मुली


वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पंजाब फॉरेन्सिक सायन्स एजन्सीच्या (PFSA) पथकासह घटनास्थळाची कसून पाहणी केली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ज्यावेळी घरात ही थरारक घटना घडली, त्यावेळी राबिया यांच्या 13 आणि 11 वर्षांच्या दोन लहान मुली घराच्या लॉनमध्ये आजीसोबत होत्या.

कोण होत्या राबिया अहसान?


41 वर्षीय राबिया अहसान या पाकिस्तानच्या पत्रकारिता विश्वात एक परिचयाचा चेहरा होत्या. त्या ’92 न्यूज’ या आघाडीच्या खासगी वृत्तवाहिनीशी जोडलेल्या होत्या. त्यांनी अनेक चालू घडामोडींवरील लोकप्रिय कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले होते. पाकिस्तानचे ज्येष्ठ पत्रकार आमिर मतीन आणि रौफ क्लासरा यांच्यासोबत त्यांनी सह-निवेदक म्हणून काम केले होते. त्यांच्या अचानक जाण्याने पाकिस्तानमधील पत्रकार आणि माध्यमांच्या वर्तुळात प्रचंड संताप आणि शोक व्यक्त केला जात आहे.

फर्स्ट लेडी’ असिफा भुट्टो-झरदारी यांनी व्यक्त केली चिंता

या भयंकर घटनेवर पाकिस्तानच्या ‘फर्स्ट लेडी’ असिफा भुट्टो-झरदारी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून, या प्रकरणाची पूर्णपणे निष्पक्ष, सखोल आणि पारदर्शक चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.कौटुंबिक वाद की पूर्वनियोजित कट?

गेल्या ऑगस्ट महिन्यात रावळपिंडीतच डिजिटल मीडिया एक्झिक्युटिव्ह हिना जावेद यांचीही राहत्या घरात संशयास्पदरीत्या हत्या झाली होती. या दोन्ही घटनांचा संदर्भ देत असिफा म्हणाल्या, एकाच शहरात नोकरदार आणि व्यावसायिक महिलांना सातत्याने हिंसेचा बळी पडावे लागणे हा अत्यंत चिंतेचा विषय आहे. महिलांना कोणत्याही भीतीशिवाय सुरक्षितपणे जगता आणि काम करता आलेच पाहिजे. या प्रकरणात पोलीस आता कौटुंबिक वाद की पूर्वनियोजित कट या दोन्ही बाजूंनी तपास करत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close