क्राइम

लाचखोर पोलिस उपनिरीक्षक आणि हवालदार ACB च्या जाळ्यात 

Spread the love

जालना /विशेष प्रतिनिधी 

 मुलाविरुद्ध दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्यामध्ये कोणतीही कारवाई न करण्यासाठी २५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून, तडजोडीअंती २० हजार रुपये घेताना बदनापूर पोलिस ठाण्यातील

सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक आणि एका पोलिस अंमलदाराला छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता बाजार गेवराई फाटा येथे रंगेहाथ पकडले. एएसआय गोविंद फुलसिंग डोभाळ आणि पोलिस अंमलदार परमेश्वर नामदेव ढगे अशी लाचखोर पोलिसांची नावे असून, एएसआय डोभाळ याला ५५ हजार तर पोलिस अंमलदार ढगे याला ३५ हजार रुपये पगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

बदनापूर तालुक्यातील ४२ वर्षीय शेतकरी तक्रारदाराच्या मुलाविरुद्ध बदनापूर ठाण्यात एक अदखलपात्र गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी आणि कोणतीही कारवाई न करण्यासाठी बदनापूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गोविंद फुलसिंग डोभाळ आणि पोलिस अंमलदार परमेश्वर नामदेव ढगे यांनी तक्रारदाराकडे २५,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लगेच छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली.

तक्रारीनुसार ९ ऑक्टोबर रोजी लाचलुचपत विभागाच्या पथकाने लाचेच्या मागणीची पडताळणी केली. त्यावेळी दोघांनीही २५ हजार रुपयांवरून तडजोड करत २० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. त्यानंतर पथकाने बदनापूर तालुक्यातील बाजार गेवराई फाटा येथे लगेच सापळा रचला. ठरल्याप्रमाणे आरोपी अंमलदार परमेश्वर ढगे याने एएसआय गोविंद डोभाळ याच्या सांगण्यावरून पंचांसमक्ष २०,००० रुपयांची रक्कम स्वीकारली. रक्कम हातात पडताच दबा धरून बसलेल्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने दोघांनाही रंगेहाथ ताब्यात घेतले. याप्रकरणी बदनापूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, आरोपींच्या घरांची झडती घेण्याचे कामही सुरू आहे.

यांनी केली कारवाई ही कारवाई छत्रपती संभाजीनगरच्या पोलिस अधीक्षक माधुरी केदार कांगणे, अपर पोलिस अधीक्षक शशिकांत सिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक प्रशांत पवार, पोलिस निरीक्षक प्रतिभा आबुज, सहाय्यक सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक अमोल सोनवणे, अंमलदार अशोक नागरगोजे, साईनाथ तोडकर, रामेश्वर गोरे, चालक रामेश्वर ताठे यांच्या पथकाने केली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close