मुख्य आरोपी आणि अन्य आरोपींमध्ये १५० वेळा संभाषण झाल्याचा पोलिसांचा दावा

पूर्णेकर हत्याकांड …..
मुख्य आरोपी आणि अन्य आरोपींमध्ये १५० वेळा संभाषण झाल्याचा पोलिसांचा दावा
आरोपींना पळून जाण्यासाठी पप्या शिंदे याने वाहन उपलब्ध करून दिले – पोलिस
ठाणे / विशेष प्रतिनिधी
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येच्या सुमारे दहा दिवस आधी पप्या शिंदे आणि अन्य आरोपींमध्ये मोबाईलवरून सुमारे १५० वेळा संभाषण झाल्याचे कॉल डिटेल रेकॉर्डवरून (सीडीआर) समोर आले आहे.
तसेच, अन्य आरोपींना घटनास्थळावरून पळून जाण्यासाठी पप्या शिंदे याने मोटार उपलब्ध करून दिल्याचा पोलिसांचा दावा आहे. ही मोटार जप्त करायची असल्याचे पोलिसांनी ठाणे न्यायालयात सांगितले. पप्या शिंदे वापरत असलेला मोबाईल क्रमांक दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर असल्याचेही तपासात समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांना आपल्यापर्यंत पोहोचता येऊ नये, या उद्देशाने त्याने हा क्रमांक वापरला असावा, असा दावा वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी न्यायालयात केला. दरम्यान, सर्व युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने पप्या शिंदे याला ९ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्याकांडप्रकरणी ठाणे पोलिसांनी पप्या शिंदे, निखील यादव आणि नितेश पवार या तिघांना अटक केली आहे. पप्या शिंदे याची पोलीस कोठडी सोमवारी संपत असल्याने त्याला न्यायमूर्ती एस. बी. साबळे यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. तपास पथकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी पप्या शिंदे याच्याविरोधात यापूर्वी सात गुन्हे दाखल असल्याचे न्यायालयाला सांगितले. प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे. ही हत्या नियोजनपूर्वक आणि थंड डोक्याने करण्यात आली असून, त्यासंदर्भातील पुरावे गोळा करण्यासाठी पप्या शिंदेची आणखी नऊ दिवस पोलीस कोठडी आवश्यक असल्याचा युक्तिवाद साळवी यांनी केला.
पूर्णेकर कुटुंबीयांच्या वतीने वकील समीर हाटले यांनी युक्तिवाद करताना, हत्येचे नियोजन सुमारे सहा महिन्यांपासून सुरू असल्याचा दावा केला. निवडणुकीच्या काळात पप्या शिंदे वेगळ्या गटात गेला होता. त्यानंतर तो पुन्हा जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. हत्येपूर्वी प्रदीप पूर्णेकर कार्यालयात कोणत्या वेळी जातात, याची माहिती पप्या शिंदेला असल्याचेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. या हत्याकांडामागील मुख्य सूत्रधार कोण, हा प्रश्न उपस्थित होत आहे. आरोपींना कोणी पैसे दिले, आर्थिक व्यवहार कसे झाले, याचा तपास होणे आवश्यक असल्याचे वकील हाटले यांनी सांगितले. तसेच आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.
दरम्यान, पप्या शिंदे याचे वकील संग्राम शिंदे यांनी आरोपी आणि प्रदीप पूर्णेकर यांच्यातील पूर्वीच्या संबंधांचा उल्लेख केला. प्रदीप पूर्णेकर यांना रुग्णालयात दाखल करताना पप्या शिंदे उपस्थित होता. तसेच गणेशोत्सवाच्या काळात प्रदीप पूर्णेकर हे पप्या शिंदेच्या घरी जेवण्यासाठी गेले होते, असे त्यांनी न्यायालयात सांगितले. राम पूर्णेकर हे पुरवणी जबाबात दोन राजकीय व्यक्तींची नावांचा उल्लेख करत आहेत. त्या दिशेने पोलीस तपास का करत नाहीत असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तपासात पोलिसांना अपेक्षित असलेली माहिती आरोपींकडूनच का मागितली जात आहे, असा मुद्दाही त्यांनी मांडला.




