क्रूरतेचा कळस,अल्पवयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार करून चाकूने भोसकून हत्या


शेतात मृतदेह फेकून आरोपी फरार, एक हात गायब आणि चेहरा विद्रूप
दिल्ली /क्राईम रिपोर्टर
राजधानी दिल्ली पुन्हा निर्भया कांड सारख्या घटनेने हादरली आहे. येथे चार तरुणांनी एका १६ वर्षाच्या अल्पवयीन तरुणीवर अत्याचार करत तिची चाकूने भोसकून हत्या केली आहे.तिचा मृतदेह बाह्य दिल्लीतील स्वरूप नगर येथील एका शेतात फेकून दिला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
आरोपींपैकी तीन जण अल्पवयीन आहेत, सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून एका १९ वर्षांच्या तरुणाला अटक करण्यात आली आहे, तर तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेबाबत तपासाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींपैकी एक १७ वर्षांचा मुलगा हा पीडितेचा ‘मित्र’ असल्याचे दिसत होते आणि ती त्याला भेटायला गेली होती. इतर तीन आरोपी या १७ वर्षांच्या मुलाचे मित्र होते, असे पोलिसांनी सांगितले. प्रकरणाची माहिती असलेल्या दोन तपासाधिकाऱ्यांनी एका इंग्रजी वृत्तसंस्थेला माहिती देताना सांगितले की, हा गुन्हा शुक्रवारी (ता ११) घडल्याचे दिसते. स्थानिकांनी कुत्रे आणि इतर प्राण्यांना मृतदेहावर हल्ला करताना पाहिल्यानंतर रविवारी सकाळी या मुलीचा अत्यंत कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला.
उजवा हात गायब, चेहरा विद्रूप
स्वरूप नगरमधील कुशक रोडजवळील एका शेतात मृतदेह पडला असल्याची माहिती रविवारी (ता १३) सकाळी मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतदेह छिन्नविछिन्न झाला होता, त्याचा उजवा हात गायब होता आणि कुजल्यामुळे चेहरा व पोट विद्रूप झाले होते. “केवळ दोनच दिवस झाले असले तरी हवामानाचा थेट परिणाम झाल्यामुळे मृतदेह अतिशय वेगाने कुजत होता. चेहरा ओळखण्यासारखा उरला नव्हता. वैद्यकीय अहवालात अत्याचाराची पुष्टी झाली असून तिच्या शरीरावर आठ जखमा आढळल्या आहेत. तिची हत्या करून मृतदेह या भागात फेकून दिल्याचे दिसून आले, जिथे प्राण्यांनी मृतदेहावर हल्ला केला,” असे पहिल्या तपास अधिकाऱ्याने सांगितले.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले की, सुरुवातीला मुलीची ओळख पटू शकली नव्हती. त्यानंतर तिची ओळख पटवण्यासाठी आणि तिच्या कुटुंबाचा शोध घेण्यासाठी तपास पथके तैनात करण्यात आली. कुटुंबीयांचे निवेदन आणि शवविच्छेदन अहवालाच्या आधारे पोलिसांनी हत्या, अत्याचार आणि पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल केला. तपासाधिकाऱ्यांनी सांगितले की, मुलीच्या शरीरावर चाकूने वार केल्याच्या अनेक जखमा होत्या. अतिरिक्त पोलीस उपआयुक्त लोकेश्वरन आर आणि एसीपी रविंदर अहलावत यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मृतदेह फेकून दिलेल्या परिस्थितीचा तपास सुरू केला. शनिवारच्या रात्री किंवा रविवारी कोणत्याही स्थानिक रहिवाशाने मुलीला पाहिल्याचे सांगितले नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले.
शेताच्या आसपासच तपासाधिकाऱ्यांनी या परिसरातील ५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. या दरम्यान, गुन्ह्याच्या संशयित वेळेत त्यांना त्या ठिकाणी एक टेम्पो फिरताना दिसला. वाहनाचा नोंदणी क्रमांक स्पष्ट दिसत नव्हता, परंतु स्थानिक चौकशीच्या आधारे तपासाधिकाऱ्यांना अखेर तो टेम्पो शोधण्यात यश आले. पोलिसांनी टेम्पो चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले, त्याने पोलिसांना सांगितले की त्याचा लहान भाऊ (१७ वर्षे) हा टेम्पो वारंवार वापरत असे. “सीसीटीव्ही फुटेजमध्ये टेम्पोमध्ये चार तरुण मुले असल्याचेही दिसून आले. या मुलांची लवकरच ओळख पटली, परंतु ते आपल्या घरातून पळून गेले होते,” असे एका तपासाधिकाऱ्याने सांगितले.
पोलीस उपआयुक्त शोभित सक्सेना यांनी सांगितले की, तपासाधिकाऱ्यांनी अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील टेम्पोच्या हालचालींचे विश्लेषण केले आणि आरोपींचा मार्ग निश्चित करण्यासाठी या फुटेजची स्थानिक चौकशीशी सांगड घातली. “मिळालेल्या माहितीच्या आधारे मंगळवार-बुधवारच्या मध्यरात्री रात्रभर शोधमोहीम राबवण्यात आली. स्वरूप नगरमधील खड्डा कॉलनीत टेम्पोचा मागोवा घेण्यात आला. त्याच्या चालकाची ओळख पटवून त्याची चौकशी करण्यात आली. पुढील तपासात चार जणांना ताब्यात घेण्यात आले,” असे सक्सेना म्हणाले.
आधी अल्पवयीन मुलाने अत्याचार केला, नंतर इतरांनी….
शिवम गणेश (१९) आणि १७ व १६ वयोगटातील तीन अल्पवयीन मुले अशी आरोपींची ओळख पटली असल्याचे पोलिसांनी सांगितले. तपासाधिकाऱ्यांनी गुन्ह्यात वापरलेले दोन चाकू आणि आरोपींनी घातलेले कपडे जप्त केले आहेत. चारपैकी किमान तीन आरोपींनी पीडितेवर अत्याचार केल्याची कबुली दिल्याचं दोन पोलीस अधिकाऱ्यांनी एका इंग्रजी वृत्तसंस्थेला सांगताना स्पष्ट केले. दुसऱ्या तपासाधिकाऱ्याने सांगितले, “आम्हाला आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, ती अल्पवयीन मुलगी शुक्रवारी रात्री १७ वर्षांच्या मुलाला भेटायला गेली होती. त्यानेच तिच्यावर पहिल्यांदा अत्याचार केला, ज्यानंतर तिने या गुन्ह्याची तक्रार पोलिसांत करण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने आपल्या मित्रांना बोलावले, ज्यांनी तिला पकडून ठेवून तिच्यावर अत्याचार केला. ते सर्व दारूच्या नशेत होते.”
“अत्याचार केल्यानंतर त्यांनी तिला शेतात नेले आणि तिच्यावर ६ पेक्षा जास्त वेळा चाकूने वार केले. त्यांनी मृतदेह पालापाचोळा आणि मातीखाली लपवण्याचा प्रयत्न केला. नंतर ते टेम्पोतून पळून गेले. अत्याचार वाहनात झाला की शेतात, याचा आम्ही तपास करत आहोत,” असे त्या अधिकाऱ्याने पुढे सांगितले. ही मुलगी शाळेतून बाहेर पडलेली होती आणि काही वर्षांपूर्वी स्वरूप नगर येथे राहण्यास आली होती. ती तिच्या आई-वडिलांना मदत करण्यासाठी नोकरीच्या शोधात होती आणि त्यांच्यापासून वेगळी राहत होती, असे पोलिसांनी सांगितले.
मुलगी बेपत्ता असल्याचे पालकांना माहित नव्हते
ती बाहेर गेली आहे आणि दोन दिवसांपासून बेपत्ता आहे हे तिच्या पालकांना माहितीच नसल्यामुळे कोणतीही बेपत्ता झाल्याची (मिसिंग) तक्रार दाखल करण्यात आली नव्हती, असे पोलिसांनी सांगितले. अखेर तपासाधिकाऱ्यांनी पूर्वी तिला त्या भागात पाहिलेल्या स्थानिक रहिवाशांच्या मदतीने तिची ओळख पटवली. “घटनांचा पूर्ण क्रम प्रस्थापित करणे, ताब्यात घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक भूमिका निश्चित करणे, उपलब्ध सर्व फॉरेन्सिक आणि तांत्रिक पुराव्यांची पडताळणी करणे आणि या गुन्ह्यात इतर कोणत्याही व्यक्तीचा सहभाग आहे का हे तपासण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. जप्त केलेल्या वस्तू फॉरेन्सिक तपासासाठी सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत आणि त्यानुसार आवश्यक ती कायदेशीर कारवाई केली जाईल,” असे सक्सेना म्हणाले.




