क्राइम

व्हिडिओत हसली , कुटुंबियांना दिसली आणि जाळ्यात फसली 

Spread the love
                  अन्य कोणाच्या प्रेमात असलेल्या महिलेकडून पतीची हत्या करण्याच्या घटनेत कमालीची वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. कधी पत्नी पतीचा खून करून निळ्या ड्रम मध्ये भरत आहे. तर कधी त्याला डोंगरावरून ढकलून देत आहे. तर कधी खून करून जमिनीत पुरून देत आहे. या सगळ्या प्रकरणात महिलेचे विवाहबाह्य संबंध कारणीभूत असल्याचे उघड झाले आहे. या क्षृंखलेत आणखी एका घटनेची भर पडली आहे.
12 दिवसांपूर्वी झालेल्या 27 वर्षांच्या महेश मीणाच्या मृत्यूला वेगळं वळण लागलं आहे. जिच्यासोबत सात जन्म सोबत राहण्याचं वचन घेतलं तिनेच महेश मीणाची हत्या केल्याचा गंभीर आरोप केला जात आहे. आरोपी पत्नी महेशच्या अस्थिविसर्जनासाठी हरिद्वारला गेली, घरी आल्यानंतर स्वत:ला दु:खात दाखवण्यासाठी तिने अश्रूही ढाळले, पण एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आणि या प्रकरणात नवा ट्विस्ट आला.
5 ऑगस्टच्या सकाळी महेश त्याची पत्नी कविताला औषध घेण्यासाठी बाईकवरून निघाला. औषध घेतल्यानंतर दोघं संध्याकाळी उशिरापर्यंत घरी परतले नाहीत, त्यामुळे कुटुंबाची चिंता वाढली. 5 वाजता महेशचा छोटा भाऊ मनिषने वहिनी कविताला फोन केला. कविताने फोन उचलला आणि लवकरच घरी येतोय, असं सांगितलं, पण काही वेळानंतर असा एक फोन आला ज्याने पूर्ण कुटुंबाला धक्का बसला
कविताने मनिषची तब्येत अचानक बिघडल्याचं सांगितलं, तसंच लवकर विश्वकर्मा भागात 14 नंबर पुलाजवळ या, असा निरोप कविताने फोनवर दिला, यानंतर मनिष बहिण संतोषसोबत घटनास्थळी पोहोचला, पण महेश रस्त्याच्या कडेला बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता, यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. सुरूवातीला कविताने जयपूरच्या श्याम नगरमधील 200 फूट चौकाजवळ महेशची तब्येत बिघडल्याचं कुटुंबाला सांगितलं. महेश बेशुद्ध झाला, त्यानंतर मी त्याची बाईक सांभळाली, 14 नंबर पुलाजवळ रस्त्याच्या शेजारी त्याला झोपवलं, असं कविता म्हणाली.
महेशचे वडील बाबूलाल मीणा यांना कविताच्या या उत्तरावर संशय आला. मुलाचा मृत्यू सामान्य परिस्थितीमध्ये झाला नसल्याचं वडिलांना वाटत होतं, त्यामुळे त्यांनी दुसऱ्या मुलाला घेऊन घटनास्थळाच्या आसपासचे सीसीटीव्ही कॅमेरे शोधायला सुरूवात केली, याची माहिती त्यांनी कविताला दिली नाही. सीसीटीव्ही पाहिल्यानंतर या प्रकरणाला धक्कादायक वळण लागलं.
कुटुंबाने शोधले सीसीटीव्ही
सीसीटीव्ही फुटेजमध्ये कविताने सांगितलेल्या कहाणीपेक्षा वेगळं चित्र दिसल्याचा दावा महेशच्या वडिलांनी केला आहे. महेशला कविता एकटी बाईकवर घेऊन जात नव्हती, तर दोन बाईकवर तीन तरुण तिच्यासोबत दिसत आहेत. एका बाईकवर कविता दुसऱ्या युवकासोबत मागे बसली होती, तर दुसऱ्या बाईकवर दोन तरुण महेशला मध्ये बसवून घेऊन आले. सीसीटीव्हीमधल्या पुराव्यांच्या आधारे या तीन मुलांचा शोध घेण्यात आला तेव्हा त्यांची नावं गणेश, अजय मीणा आणि गोलू प्रजापत असल्याचं स्पष्ट झालं.
या सगळ्यांनी मिळून महेशची हत्या करण्याचा कट रचला, त्याला विष दिलं गेलं, असा आरोप महेशच्या वडिलांनी केला आहे. मुलाच्या मृत्यूच्या 12 दिवसांनी 16 ऑगस्टला महेशच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली. यात त्यांनी सून कविता, तिचा कथित बॉयफ्रेंड गणेश आणि त्याचे दोन मित्र अजय मीणा आणि गोलू प्रजापत यांच्यावर गंभीर आरोप केले.
कविताच्या वर्तनाने संशय वाढला
महेशचा भाऊ गगन मीणाने दिलेल्या माहितीनुसार 12 नोव्हेबंर 2024 ला महेशचं लग्न कवितासोबत झालं होतं, गर्भाशयाला सूज आल्यामुळे कविता देशी औषध घ्यायची, पण घटनेच्या दिवशी डॉक्टरकडे जाण्याऐवजी कविता तिच्या माहेरी गेली. यानंतर महेशचा संशयास्पद मृत्यू झाला. पोस्टमॉर्टम झाल्यानंतर महेशच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले, पण पतीच्या मृत्यूनंतर कविताचं वर्तन बदललं, त्यामुळे कुटुंबाचा संशय वाढला.
कुटुंबाने घटनास्थळावरचे सीसीटीव्ही तपासले, ज्यात कविता तीन मुलांसोबत दिसली, ज्यात एक गणेश होता, जो या प्रकरणातील महत्त्वाचा दुवा होता. कविता आणि गणेश 9 वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते, तसंच लग्नानंतरही दोघांमध्ये बोलणं आणि भेट व्हायची, असाही आरोप आहे. कविता एक-दोनवेळा सासर सोडून गणेशसोबत गेल्याचा आरोपही आहे. संपूर्ण घटनाक्रमाचा सीसीटीव्ही जेव्हा कविताला दाखवला गेला, तेव्हा तिने आपल्याला काहीच माहिती नसल्याचं सांगितलं.
हसली अन् फसली
समोर आलेल्याा एका व्हिडिओमध्ये कुटुंबाने तिला महेशच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी विचारलं तेव्हा ती हसायला लागली आणि मी तर फसले, आता घरातले मला मारतील, असंही म्हणाली. एवढंच नाही तर आणखी एका व्हिडिओमध्ये कविताने तिच्या बॉयफ्रेंडला फोन करून किती लपेल, पकडला तर तो पण जाणार आहे, असं सांगितलं. ये दोन्ही व्हिडिओ कुटुंबाने पोलिसांना दिले आहेत. कविताला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी कुटुंबाने केली आहे.
काय म्हणाले पोलीस?
सुरूवातीला महेशचा मृत्यू नैसर्गिक असल्याचं समजून नोंद केली गेली, पण नंतर पोलिसांनाही संशय आला. घटनेचे सीसीटीव्ही समोर आल्यानंतर पोलिसांनी कवितासह अन्य तिघांवर हत्येचा आरोप केला. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपींना अटक केली आहे. तसंच समोर आलेल्या व्हिडिओंची सत्यता तपासली जात आहे. या व्हिडिओमध्ये बोलल्या गेलेल्या गोष्टींचाही तपास केला जात आहे. पोलीस आता सीसीटीव्ही, पोस्टमॉर्टम रिपोर्ट, मेडिकल रिपोर्ट, मोबाईल कॉल डिटेल तपासत आहेत, अशी माहिती डीसीपी प्रशांत किरण यांनी दिली.
ज्यूसमधून दिलं विष
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कविताने महेशला ज्यूसमधून सल्फासच्या गोळ्या दिल्या, यानंतर काही वेळाने विषाचा परिणाम दिसायला सुरूवात झाली, त्यामुळे महेशची तब्येत बिघडली, यानंतर कविताने प्रियकर गणेशला बोलवून घेतलं. कुणालाही संशय येऊ नये म्हणून कविताने महेशच्या भावाला फोन करून बोलवून घेतलं, पण समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमुळे कविताचं बिंग फुटलं.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close