क्राइम

नागपूर हादरले! सैनिकी स्कूलमध्ये विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाचा आरोप; संचालकाला अटक

Spread the love
प्रतिनिधी / नागपुर
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील एका सैनिकी प्रशिक्षण अकादमीत अल्पवयीन विद्यार्थिनींच्या लैंगिक व मानसिक छळाचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणी १७ वर्षीय विद्यार्थिनीने दिलेल्या तक्रारीनंतर केळवद पोलिसांनी अकादमीचे संचालक हरिश्चंद्र गोपाळ राणे (वय ३८) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
तक्रारीनुसार, सैनिकी प्रशिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थिनींसोबत अयोग्य स्पर्श, अश्लील वर्तन आणि लैंगिक संबंधासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच संचालक मध्यरात्री विद्यार्थिनींना कार्यालयात बोलावून गैरवर्तन करत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पोक्सोसह संबंधित विविध कलमांनुसार कारवाई केली आहे.
दोन महिन्यांपूर्वीच प्रकार निदर्शनास आणल्याचा दावा
पीडित विद्यार्थिनींच्या म्हणण्यानुसार, हा प्रकार सुमारे दोन महिन्यांपूर्वी शिक्षकांच्या निदर्शनास आणून देण्यात आला होता. मात्र त्यावेळी तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या दाव्याचीही पोलिसांकडून चौकशी केली जात आहे.
अकादमीत एकूण ५६ विद्यार्थी असून त्यापैकी १४ मुली असल्याची माहिती समोर आली आहे. प्रकरण उघडकीस आल्यानंतर १४ पैकी ११ विद्यार्थिनींनी अकादमी सोडल्याचे सांगितले जात आहे.
पोलिसांचा तपास सुरू
संचालकाला अटक केल्यानंतर पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. तक्रारीतील आरोपांची सत्यता, इतर विद्यार्थिनींचे जबाब तसेच यापूर्वी संबंधित शिक्षकांना या प्रकाराची माहिती होती का, यासह विविध बाबींची चौकशी केली जात आहे.
दरम्यान, या गंभीर प्रकरणामुळे पालकांमध्ये संतापाचे वातावरण असून संबंधित सैनिकी अकादमीची मान्यता रद्द करण्याची मागणी केली जात आहे.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close