भिवंडी येथील इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या आता ८ वर पोहोचली


घटनास्थळी अद्यापही भीतीचे सावट कायम आहे.
भिवंडीत इमारत दुर्घटनेनंतर बचावकार्य तीव्र; NDRF कडून ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर
भिवंडी शहरातील भंडारी कम्पाउंड भागात घडलेल्या दुर्दैवी इमारत दुर्घटनेनंतर घटनास्थळी बचावकार्य अत्यंत वेगाने सुरू आहे. एनडीआरएफ (NDRF) आणि टीडीआरएफ (TDRF) च्या जवानांकडून ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर चालवले जात आहे.
ढिगाऱ्याखालून आतापर्यंत ८ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेतय जशी शोधमोहीम पुढे सरकत आहे तसतसा मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. ढिगाऱ्याखाली अजूनही काही नागरिक अडकल्याची दाट भीती व्यक्त केली जात आहे. संपूर्ण ढिगारा पूर्णपणे बाजूला केल्याशिवाय आणि शोधमोहीम संपल्याशिवाय दुर्घटनेतील एकूण जीवितहानीचा स्पष्ट आकडा समोर येऊ शकणार नाही, असे बचाव पथकाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
ढिगाऱ्याखाली अडकलेल्या बाधिताच्या कुटुंबाचा हृदयद्रावक आक्रोश
भिवंडी येथील इमारत दुर्घटनेनंतर घटनास्थळी नातेवाईकांची प्रचंड गर्दी जमली असून त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला आहे. या दुर्घटनेत अडकलेल्या ‘समीन’ नावाच्या तरुणाच्या नातेवाईकांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अत्यंत दुःखाश्रूंनी आपली आपबिती सांगितली. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, समीन हा दुर्घटनाग्रस्त इमारतीमध्ये राहत नव्हता; तो जवळच एका सलूनमध्ये (Salon) काम करायचा. दुर्घटनेच्या काही वेळेआधीच तो काही पैसे ठेवण्यासाठी त्या इमारतीमध्ये गेला होता. मात्र, तितक्यात ही काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना घडली आणि तो ढिगाऱ्याखाली गाडला गेला.
“तो नक्की कुठे आहे? त्याची अवस्था काय आहे? हे आम्हाला कोणीतरी स्पष्ट सांगा,” असा आर्त टाहो त्याच्या कुटुंबातील महिला आणि पुरुषांनी घटनास्थळी मारला. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आपल्या माणसाला लवकरात लवकर सुरक्षित बाहेर काढावे, यासाठी नातेवाईक रुग्णालय आणि प्रशासनाकडे आशेने वाट पाहत आहेत.

