पंलपरंपरा मोडीत न काढता सुरळीत करा
श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ
बाळासाहेब नेरकर कडुन
भारतीय संस्कृतीतील प्रत्येक परंपरा ही अध्यात्मिक विश्वास आणि विज्ञानाच्या तत्वावर आधारित असून ; त्यातही कुठलीच परंपरा ही निरर्थक किंवा कालबाह्य झालेली नाही. म्हणून समाजातील तथाकथित समाज सुधारकांनी समाज सुधारणेच्या व विज्ञान युगाच्या गोंडस नावाखाली माता पित्याची तेरवी व वर्षश्राद्ध तसेच लग्न प्रसंगातील अहेर व आंदण या परंपरा अकारण व अवास्तव खर्चाच्या नावाखाली मोडीत काढण्यापेक्षा सुरळीत करण्याचा प्रयत्न करून सामाजिक सलोखा व संस्कृतीच्या संक्रमणाला सहकार्य केले पाहिजे असे कळकळीचे आवाहन भागवताचार्य श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी केले.
ते आज श्री संत वासुदेवजी महाराज स्मृति मंदिर श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ येथे सद्यस्थितीत मुलांच्या विवाह करिता होत असणाऱ्या विलंबाच्या ज्वलंत प्रश्नावर उपस्थित समाज धुरीनांशी अनौपचारिक चर्चा करीत असतांना बोलत होते. ते पुढे म्हणाले की, पूर्वीच्या काळी केवळ चिमूटभर ओल्या कुंकवाच्या माध्यमातून संपन्न होत असणाऱ्या साक्षगंधाच्या अर्थातच इसार चिठ्ठीच्या कार्यक्रमात आज लाखो रुपयांची उधळपट्टी केल्या जाते. तसेच व्याही भेटीच्या कार्यक्रमाला समांतर व्यवस्था म्हणून अलीकडच्या काळात साखर भेट आदिकरून अशास्त्रीय गोष्टी समाजात रूढ होत आहेत. एवढेच नाही तर वटभरणाच्या पती-पत्नीच्या वैयक्तिक कार्यक्रमाचे त्याचे सार्वजनिकरण होऊन माता पित्याची तेरवी व वर्षश्राद्ध या शास्त्रोक्त परंपरागत सार्वजनिक कृतज्ञता सोहळ्याचे घरगुतीकरण करून , प्रसंगी ते अवाजवी व अकारण खर्चाच्या नावाखाली मोडीत काढण्याचा पुरोगामीत्वाच्या नावाखाली हेतूपुरस्सर प्रयत्न केल्या जात आहे. वास्तविक पाहता या निमित्ताने होत असणारे अन्नदान हे समाजातील दूरी कमी करून विचाराची देवाणघेवाण करणारा एक सामाजिक यज्ञ आहे. त्या तेरा दिवसात संपन्न होत असणाऱ्या या विधीच्या माध्यमातून समाजातील विविध क्षेत्रातील गणमान्य व वयोवृद्ध मंडळी त्या दुःखीच कुटुंबाला सांत्वनावर भेट देऊन अकाली मातृ-पितृ छत्र हरपलेल्या त्या मुलाला स्वैराचारी किंवा नैराश्याच्या खाईत पडण्यापासून वाचविण्याच्या दृष्टिकोनातून प्रबोधन करीत होते. एवढेच नाही तर त्याच कालखंडात समाजातील धुरीनांच्या भेटीगाठीतून स्थानिक राजकारणांचे डावपेच आखण्या बरोबरच बऱ्याच मुला मुलीचे विवाह सुद्धा जोडल्या जात होते.
ते मोडीत काढल्याने परिचितांच्या विवाहात सुद्धा मध्यस्थ होण्याची हिंमत कोणी करीत नसल्यामुळे आज आमच्यावर वधु वर परिचय मेळावे घेण्याची पाळी आलेली आहे. जात प्रमाणपत्राचा कागद सरकारी कार्यालयात चालतो सांस्कृतिक कार्यात नाही. त्याकरिता आचारावरून कुलाचे परीक्षण हेच सर्वोत्तम साधन असते. आणि ते वधु वर परिचय मेळाव्यात एका दिवसात होणे शक्य नाही. तसेच ” सौजन्य तेथें सोयरीक ” या भगवान श्रीज्ञानेशांच्या वचनाला फाटा देत सौजन्या ( हुंडा )करिता सोयरीक केल्या जाते. तसेच ७/१२ च्या अटीमुळे कुटुंब व्यवस्थेचे १२ वाजत आहेत. म्हणून ७/१२ ऐवजी सक्षम , सुदृढ , सजातीय, समवयस्क, संस्कारित, सुशिक्षित , सरकारी नोकरी किंवा स्वतंत्र व्यवसायिक व निर्व्यसनी या निकषांवर प्राधान्याने लक्ष केंद्रित केले पाहिजे. लग्नप्रसंगी वधू-वरांच्या मस्तकावर आशीर्वाद स्वरूप फेकल्या जाणाऱ्या अक्षदांवर भाष्य करणाऱ्यांनी बुफे पार्टीमध्ये उष्टे टाकले जाऊन होणाऱ्या अन्नाच्या नासाडीवर , विवाहपूर्वी होणाऱ्या प्री-वेडिंग वर तसेच मंगलाष्टकानंतर परस्परांच्या गळ्यात वरमाला घालण्याच्या पवित्र व अविस्मरणीय प्रसंगी वधूवरांना उचलले जाऊन वरमालेच्या व नववधूच्या होत असणाऱ्या हेडसांडीवर सुद्धा समाजधुरिनांनी भाष्य केले पाहिजे. तसेच आहेर व आंदण हे परस्परांच्या सहकार्याची पूर्वापार चालत आलेली परंपरा असून , ती सुद्धा मोडीत न काढता सुरळीत करण्याच्या दृष्टिकोनातून सर्व नातेवाईकांनी परस्पर संपर्क करून एक वस्तू पुन्हा होणार नाही याची खबरदारी घेत आपापल्या ऐपतीप्रमाणे मुलीला संसारोपयोगी वस्तू प्रदान करून वधूपित्याच्या डोक्यावरील आर्थिक भुर्दंड कमी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. आर्थिक मदत हे प्रसंगी अकारण खर्चात जाते याउलट वस्तुरूप भेट कायम राहून तन्निमित्याने त्या नातेवाईकाचे त्या मुलीला सदैव स्मरण होऊन , तिला सासरी नांदत असतांना वस्तूरूपानेच त्यांच्या सानिध्याचा आनंद सुद्धा प्राप्त होतो . किंबहुना आर्थिक स्वरूपाची मदत स्वीकारतांना आजही स्वाभिमानी वधूपित्याला कमीपणाचे तर , वस्तू रूपाने स्वीकारणे हे स्वाभिमानाचे वाटते. त्यातही सस्नेह भेट देण्यात अजून गरिबांची नाही तर, श्रीमंतांची मानसिकता बदललेली आहे . म्हणूनच स्वतःची देण्याची मानसिकता नसलेले समाजातील श्रीमंतच या परंपरेच्या विरोधात बोलताना दिसतात . कारण गरीब आजही त्याच्या ऐपतीप्रमाणे त्याचा संसारासह परंपरा सांभाळतो आहे . श्रीमंतांना मात्र घेणेच माहिती असून त्यांना देणे शिकविलेच नसल्यामुळे तेच या परंपरेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. अशा अनेक ज्वलंत प्रश्नांवर महाराजांनी उपस्थितांचे प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून शंका निरसन करून मार्गदर्शन केल्याचे श्री ज्ञानेश्वर महाराज भालतिलक हे कळवितात.