प्रा. यास्मिन शेख यांना केळकर पुरस्कार प्राप्त.
‘महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थे तर्फे यंदाचा आनंद केळकर स्मृती पुरस्काराने व्याकरण तज्ज्ञ प्रा. यास्मिन शेख यांना सन्मानित करण्यात आला.
मुंबई / प्रतिनिधी
मराठी साहित्यविश्वामध्ये नियतकालिकांचे योगदान अतिशय मोठे आहे. अनेक नियतकालिकांनी समाजाला आणि समाजमनाला घडविण्याचे कार्य अतिशय चोखपणे केले आहे. ‘अंतर्नाद’ने मराठी माणसाची अभिरुची घडवण्याचे मोठे काम केले आहे. लेखक व चिकित्सक संपादक भानू काळे यांच्या विविध साहित्याचा व संपादनाचा मराठी वाचक दीर्घकाळ आस्वाद घेत होते. या ‘अंतर्नाद’ने माझ्या आयुष्यात खूप माणसांना भेटण्याची संधी दिली. त्यांच्या साहित्याने आणि सहवासाने आल्हाददायक चांदणे माझ्याही वाट्याला आले, हे मी माझे भाग्य समजतो. त्यांपैकी प्रा. यास्मिन शेख या एक. त्यांनी मराठी भाषेचे व्याकरण आणि भाषाशास्त्रात गेली सत्तर वर्षे कार्य केले आहे. अशा या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाचा सहवास मला लाभला. मराठी भाषेतीलच काय, पण कोणत्याही भाषेतील व्याकरण हा एक रूक्ष विषय. पण त्यांचे मराठी राज्य विकास संस्थेने प्रकाशित केलेले पुस्तक ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ इतकी सोपी आहे की, अर्थवाहक भाषा, निरीक्षणातील स्वतःचा वेगळेपणा, बहुश्रुत संदर्भसंपन्नता यामुळे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यापासून ते भाषेच्या अभ्यासकांपर्यंत कोणालाही सहजपणे समजते. या प्रा. यास्मिन शेख सध्या ९९ व्या वर्षाच्या आहेत. लवकरच २१ जूनला त्या शंभराव्या वर्षात पदार्पण करतील. या वयातही त्यांच्या व्याकरणातील प्रयोगशील लेखणीला आळस आणि कंटाळा या गोष्टी माहीत नाहीत. लोकसत्तेत ‘भाषासूत्र’ नावाच्या सदरातून २०२२ साली दर सोमवारी ‘मराठी लेखनात वारंवार होणाऱ्या चुका’ या सदरातून वर्षभर अतिशय सोप्या भाषेत व्याकरणाची ओळख करून दिली. औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयात दोन वर्षे आणि शीवच्या एस. आय. ई. एस. महाविद्यालयात पंचवीस वर्षे अनेक विषयांचे अध्यापन केले आहे. सेवानिवृत्ती नंतर १० वर्षे भारतीय प्रशासन सेवेतील (आय. ए. एस.) अधिकाऱ्यांना व्याकरण आणि भाषाशास्त्र शिकवले आहे. या अध्यापकीय पेशानुसार व्याकरण समजून घेण्यावर आणि समजून देण्यावर भर असतो. शुद्धलेखनाबाबत त्या अतिशय काटेकोर असतात.
त्यांचे नाव प्रा. यास्मिन शेख असले तरी त्यांची भाषा मराठी मातीचा अस्सल वारसा घेऊन आलेली आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणे त्यांची भाषा प्रसन्न आणि टवटवीत आहे. प्रा. यास्मिन शेख म्हणजे अतिशय साधे, शालीन आणि नम्र व्यक्तिमत्त्व. आपण मराठीतील ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ आहोत, ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ आणि ‘मराठी लेखन शब्दकोश’ या दोन पुस्तकांचे लेखन केले आहे, याचा कणभरही गर्व नाही. एखाद्या निरंजनातील ज्योत शांतपणे तेवत राहावी, असे सात्त्विक व्यक्तिमत्त्व आहे.
नाव यास्मिन अझीझ अहमद शेख. पूर्वाश्रमीच्या जेरुशा जॉन रुबेन. जन्माने ज्यू असलेल्या जेरुशा रूबेन यांनी अझीझ अहमद शेख यांच्याशी लग्न केले. प्रा. यास्मिन शेख यांना प्राथमिक शाळेत चळेकर सरांनी आणि सर परशुरामभाऊ महाविद्यालयात श्री. म. माटे यांनी मराठी भाषेच्या व्याकरणाची गोडी लावली. घरी आई-वडील मराठी बोलत व मराठी पुस्तके वाचनाची त्या दोघांना आवड होती. प्रा. यास्मिन शेख नेहमी म्हणतात, ‘भाषेला धर्म नसतो. मराठी माझी मातृभाषा आहे. त्या भाषेवर माझे नितांत प्रेम आहे.’ या भाषाप्रेमामुळेच त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ मिळाला. महाराष्ट्र शासनाचा डॉ. अशोक केळकर यांच्या नावाने दिला जाणारा एक लाखाचा ‘भाषाभ्यास पुरस्कार’ मिळाला. ९९व्या वर्षाच्या असणाऱ्या प्रा. यास्मिन शेख यांचा प्रसन्न गोरा रंग, चेहऱ्यावर बुद्धिमत्तेचे तेज, टवटवीत व प्रसन्न चेहरा समोरच्या व्यक्तीलाही प्रसन्न करतो. प्रा. यास्मिन शेख यांना महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थे’चा प्रतिष्ठेचा समजला जाणारा आनंद केळकर स्मृती पुरस्कार मिळतो आहे. त्याबद्दल मनापासून अभिनंदन !!
‘ महाराष्ट्र ग्रंथोतेजक संस्थे’ कडून दिला जाणारा यंदाचा आनंद केळकर पुरस्कार मा. यास्मिन शेख यांना संस्थेचे सहकार्यवाह मा. अविनाश चाफेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी मराठी भाषेचे ज्येष्ठ अभ्यासक मा. प्रा. प्र. ना. परांजपे , सकाळचे संपादक मा.सम्राट फडणीस, शालेय शिक्षण विभागातील अधिकारी व गेली अनेक वर्षे शिक्षण संक्रमणातून व्याकरणात सातत्याने लेखन करणारे मराठी भाषेचे अभ्यासक सलील वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते. मा.