सामाजिक

तंबाखूमुक्त शाळा घडवण्यासाठी मुक्तिपथचा मोठा वाटा : शिक्षणाधिकारी निकम

Spread the love

 


शाळा कार्यक्रमातंर्गत विजेत्यांना बक्षीस वितरण सोहळा
गडचिरोली : जिल्ह्यातील प्रत्येक शाळा व्यसनमुक्त होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी पालकांसह शिक्षकही व्यसनमुक्त असावे. कारण मोठ्या माणसांच्या अशा वागण्याचा प्रभाव लहान मुलांवर पडतो. आपली शाळा तंबाखूमुक्त करणे हे एकट्या मुक्तिपथचे काम नाही तर सर्वांनी प्रयत्न करावे. शिक्षकांनी विविध कृतिशील उपक्रम राबवून व्यसनमुक्तीचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविल्यास निश्चितच येणारी युवा पिढी व्यसनमुक्त होईल. तंबाखूमुक्त शाळा व व्यसनाचे प्रमाण कमी करण्यासाठी मुक्तिपथ चा मोलाचा वाटा आहे. असे मत जिपचे माध्यमिक शिक्षणाधिकारी निकम यांनी व्यक्त केले.
स्थानिक पत्रकार भवनातील सभागृहात मुक्तिपथ तर्फे जिल्हाभरातील 393 शाळांमध्ये घेण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धा व विचार कार्यक्रम अंतर्गत विजेत्या शाळांचा बक्षीस वितरण सोहळा सर्च संस्थेचे संस्थापक पद्मश्री डॉ. अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली आज 6 सप्टेंबर रोजी पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. सोबतच मुक्तिपथचे प्रभारी संचालक संतोष सावळकर उपस्थित होते.
गडचिरोली जिल्हा विकास कार्यक्रमांतर्गत मुक्तीपथ तर्फे जिल्ह्यातील बाराही तालुक्यामध्ये शाळा तंबाखूमुक्त करणे बाबत शाळा कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये पहिल्या टप्प्यात प्रश्नमंजुषा स्पर्धा, दुसऱ्या टप्प्यामध्ये क्लस्टर स्तरावर पथनाट्य स्पर्धा घेण्यात आली. त्यानंतर तालुकास्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धेत तंबाखूमुक्त शाळा निर्माण करण्यासाठी उपाययोजना, व्यसनाचे प्रकार, आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, विद्यार्थ्यांना व्यसनापासून कसे दूर करणार?  काय पद्धती वापरणार,कोणती कृती करणार या विषयावर विद्यार्थ्यांनी उत्तम पोस्टर सादरीकरण केले. यामध्ये प्रत्येक तालुक्यातून प्रथम व द्वितीय आलेल्या अशा 24 शाळांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमातून आलेल्या अनुभवाचे कथन केले. सोबतच व्यसनाचे दुष्परिणाम सांगणारे व्यसनमुक्त गीत सादर करून उपस्थितांचे मने जिंकली. शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त करीत मुक्तिपथच्या सहकार्याने तंबाखूमुक्त शाळा करण्यासाठी सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्याचे प्रमाण कमी झाल्याने शिक्षकांनी मुक्तिपथ चे आभार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन संतोष सावळकर तर आभार तालुका संघटक आनंद इंगळे यांनी मानले. विजेत्या शाळेतील शिक्षक, विद्यार्थी व मुक्तिपथ संघटक उपस्थित होते.

बॉक्ससाठी…..
निकोटिन ड्रग्जपेक्षाही हानीकारक : डॉ. बंग
उपदेशापेक्षा शिक्षकांच्या आचरणाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मनावर लवकर होतो. त्यामुळे मुख्याध्यापक व शिक्षकांनी दारू व तंबाखूच्या व्यसनापासून दूर राहून सुदृढ विद्यार्थी घडवावा. शाळेच्या परिसरात पानठेला असेल तर शाळेत ये- जा करतांना विद्यार्थ्यांची नजर तंबाखूजन्य पदार्थ सेवन करणाऱ्यांकडे पडते. त्यामुळे मंदिर जसे स्वछ असतो, त्याचप्रमाणे शाळेच्या आतील व बाहेरील संपूर्ण परिसर दारू व तंबाखूमुक्त असेल तर विद्यार्थ्यांवर संस्कार घडतात. गडचिरोली जिल्ह्यात तोंडाच्या कॅन्सर चे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे आई- वडिलांनी सुद्धा आपण व्यसनमुक्त राहून आपल्या मुलांना कॅन्सर पासून वाचवावे. तंबाखूजन्य पदार्थांमधील निकोटिन कोकिन, ड्रग्ज पेक्षाही लवकर व्यसन निर्माण करतो. मुलांना तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन लागू नये यासाठी हा कृतिशील कार्यक्रम शाळांमध्ये घेण्यात आला असून आखलेले कृती कार्यक्रम प्रत्यक्षात करून व्यसन म्हणजे काय याचा अभ्यास करा व आयुष्यभर व्यसनमुक्त राहा असे आवाहन सर्च संस्थेचे संस्थापक पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी केले.

बॉक्ससाठी……
स्पर्धेत यशस्वी 24 शाळा
देसाईगंज तालुक्यातील अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक जिप शाळा गांधीनगर, जिप शाळा विहिरगाव, आरमोरी तालुक्यातील जिप शाळा जोगीसाखरा, जिप शाळा डोंगरगाव, कुरखेडातील जिप शाळा उराडी, जिप शाळा गुरणोली, कोरचीतील जिप केंद्र शाळा कोरची, जिप शाळा कोचीनारा, धानोरातील जिप शाळा जांभळी, जिप हायस्कुल मोहली, गडचिरोलीतील जिप शाळा शिवणी, जिप शाळा काटली, चामोर्शी तालुक्यातील जिप कन्या शाळा कुनघाडा रै, जिप शाळा पेटतळा, मूलचेरा जिप शाळा लगाम, जिप शाळा मथुरानगर, एटापल्लीतील शासकीय आश्रम शाळा जारावंडी, जिप शाळा नेडेर, भामरागड तालुक्यातील जिप शाळा मल्लमपोदूर, जिप शाळा कियर, अहेरीतील शासकीय आश्रमशाळा जिमलगट्टा, जिप शाळा छल्लेवाडा तसेच सिरोंचा तालुक्यातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय सिरोंचा प्रथम तर व्दितीय क्रमांक जिप शाळा मेडारामने पटकाविला आहे. या शाळांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close