शिरपूर येथे कचरा व्यवस्थापन शेडमध्ये अंत्यसंस्कार
गावातील नागरिकांनी प्रशासन व लोकप्रतिनिधी बदल नाराजी
नांदगाव खंडे/ प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिरपूर येथे स्मशानभूमीचे शेड नसल्याने कचरा व्यवस्थापन शेडमध्ये अंत्यसंस्कार करावे लागले.मरणातूनंतरही मृतदेहाला अवहेलना सोसावी लागत असल्याचे भयाण वास्तव सध्या शिरपूर येथे दिसून आले आहे….
शिरपूर येथे स्मशानभूमी अभावी भर पावसात अंतिम संस्कार करणेसाठी हाल अपेष्टांना सामोरे जावे लागत आहेत.
भरपावसात मृतदेहावर अंतिम संस्काराच्या वेळी अवहेलना झाली होती. सुशीला बलापुरे या व्यक्तीचे अल्पशा आजाराने निधन झाले. सकाळ पासूनच संततधार पावसामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी अद्यापही स्मशानभूमी शेडच नसल्याने अंत्यविधी करायचा कोठे? असा प्रश्न उभा ठाकला होता.
आताच पाऊस थांबेल याची वाट पहाण्यात खुप वेळ गेला. अखेर पावसातच अंतिम संस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला. या भागात अंतिम संस्कार हे अग्निडाग, मुखाग्नी देऊन केले जातात. धो-धो पावसात मृतात्म्यांस अग्नी देणे शक्य नव्हते. शिवाय लाकडे पण ओली असल्याने अजून पेचप्रसंग निर्माण झाला.
शेवटी स्मशानभूमी शेड नसल्याने, कचरा व्यवस्थापन शेड साफ करत चितेला अग्नी देण्यात आला.
*शिरपूर येथील स्मशानभूमीत जाण्यासाठी अद्यापही रस्ता व शेड नसल्याने विशेषतः पावसाळ्यात खुपच हाल अपेष्टा सहन करावा लागत आहेत.. कित्येकदा संततधार पावसामुळे मृतदेह अर्धेच जळतात.पुन्हा पाऊस उघडल्यावर लाकडे टाकावी लागतात. कित्येकदा लोकप्रतिनिधी व संबंधित प्रशासनाला अवगत केले, निवेदन व पत्र उपचार केले. परंतु कुणीही याकडे लक्ष दिले नाही… ओम मोरे गावकरी*