या ठिकाणी माजला पुरामुळे हाहाकार ; 37 लोकांचा मृत्यू
इंडोनेशिया / नवप्रहार डेस्क
इंनडोनेशिया मधील सुमात्रा बेटावर झालेल्या मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराचा तडाख्यात 37 लोकांचा मृत्यू झाला आहे. मान्सूनआणि मारापी पर्वतावर थंड झालेल्या लाव्हामुळे मोठं भूस्खलन झाल्याने नुकसान झाल्याचे समजते.शनिवारी मध्यरात्रीपूर्वीचं नदीला पूर आला. त्यामुळे अनेक भाग पाण्याखाली गेल्याची माहिती टीव्ही नाईनच्या हवाल्यानुसार मिळत आहे.
इंडोनेशियातील सुमात्रा बेटावर मुसळधार पाऊस आणि ज्वालामुखीच्या उतारावरून थंड लाव्हामुळं मोठं नुकसान झालं आहे. मुसळधार पावसामुळे बेटावर अचानक पूर आला. या पुरात 37 लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 12 हून अधिक लोकं बेपत्ता झाल्याचं समोर आलं आहे. पश्चिम सुमात्रा प्रांतातील चार जिल्ह्यांतील गावं उद्ध्वस्त झाली आहेत.
नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट एजन्सीचे प्रवक्ते अब्दुल मुहरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरात अनेक लोकं वाहून गेले आहेत. शंभरहून अधिक घरं आणि इमारती पाण्याखाली गेल्या आहेत. रविवारी दुपारपर्यंत बचाव कर्मचाऱ्यांनी आगम जिल्ह्यातील कांडुआंग या गावातून 19 मृतदेह आणि तनाह दातार या शेजारील जिल्ह्यातून आणखी नऊ मृतदेह बाहेर काढले होते. पडांग परियमनमधील पुरादरम्यान आठ मृतदेह चिखलातून बाहेर काढण्यात आले होते. तर एक मृतदेह पडंग पंजांग शहरात सापडला होता. बेपत्ता असलेल्या लोकांचा शोध सुरू आहे. बचाव कर्मचारी बेपत्ता असलेल्या 18 लोकांचा शोध घेत आहेत.
पश्चिम सुमात्रामधील पेसिसिर सेलाटन आणि पडांग परियामन जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पूर आणि भूस्खलन झालं होतं. त्यानंतर आता दोन महिन्यांनंतर ही आपत्ती आली आहे. मागील वर्षी माऊंट मारापीमध्ये स्फोट झाला होता. त्यामध्ये 23 गिर्यारोहकांचा मृत्यू झाला होता. इंडोनेशियाच्या ज्वालामुखी आणि भूगर्भीय आपत्तींच्या केंद्रानुसार, 2011 पासून ज्वालामुखी चार सतर्क पातळींपैकी तिसऱ्या क्रमांकावर आहे. जानेवारी 2023 मध्ये झालेल्या उद्रेकापासून मरापी ज्वालामुखी सक्रिय आहे. इंडोनेशियातील 120 पेक्षा जास्त सक्रिय ज्वालामुखींपैकी हा एक आहे.