वसंत जिनींगमध्ये राजकीय वातावरण तापले
आजी व माजी अध्यक्षात कलगीतुरा
वणी./ प्रतिनिधी
शहरातील वसंत जिनींग सहकारी संस्थेमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे दिसत आहे. अपात्रतेच्या कारवाईवरून आजी व माजी अध्यक्षात कलगीतुरा बघायला मिळत आहे. शेतकरी सभासदांमध्ये सध्या हा चर्चेचा विषय ठरत आहे. वसंत जिनींग सहकारी संस्थेचे विदयमान अध्यक्ष आशिष खुळसंगे व माजी अध्यक्ष तथा विदयमान संचालक अॅड. देविदास काळे यांच्यात राजकीय युदध रंगत असल्याचे दिसत आहे.
सस्थेत कार्यरत संचालकांना अॅड. देविदास काळे नेहमी बॉयलॉज मधील उपविधीच्या अधिन राहुन संस्था चालविण्याचा सल्ला देतात. त्याच उपविधीचा आधार घेत अध्यक्ष आशिष खुळसंगे यांनी अॅड. काळे यांना संचालक पदावरून अपात्र ठरविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अॅड. काळे यांच्या भुमिकडे शेतकरी सभासदांचे लक्ष लागले आहे. अपात्रतेची माहीती जिल्हा निबंधक विभागाला देण्यात आली आहे.
वसंत जिनींग सहकारी संस्थेचे अध्यक्ष म्हणुन अॅड. देविदास काळे यांनी सलग दहा वर्ष धुरा सांभाळली आहे. एकेकाळी कर्मचाऱ्यांचे पगार देण्याची सोय नसतांना वंसत जिनींग सहकारी संस्था डबघाईस येते की काय अशी अवस्था निर्माण झाली होती. अॅड. काळे यांनी वसंत जिनींग सहकारी संस्थेचा पडत्याकाळात केलेला कायापालट सर्वश्रुत आहे. आर्थीक स्त्रोत वाढल्याने संस्था आजरोजी कर्जमुक्तीकडे वाटचाल करत असल्याचे दिसत आहे.
सहकार क्षेत्रात महत्वपुर्ण समजल्या जाणाऱ्या वसंत जिनींग सहकारी संस्थेची निवडणुक मागील दोन वर्षांपुर्वी पार पडली. त्यावेळी कॉंग्रेसमध्ये फुट पडल्याचे प्रामुख्याने दिसुन आले होते. 17 संचालकांच्या निवडणुकीत माजी आमदार वामनराव कासावार गटाने परिवर्तन घडवुन आणले. या निवडणुकीत अॅड. काळे गटाचे दोन संचालक निवडुण आले.
सत्ताधाऱ्यांचे बहुमत असल्याने वसंत जिनिंगमध्ये आजी व माजी अध्यक्षात एकमेकांविरुद्ध कुरघोडी बघायला मिळत आहे. त्याचाच परिपाक म्हणून उप विधीतील नियमांचा वापर करत विद्यमान अध्यक्षांनी माजी अध्यक्षांना अपात्र ठरविण्याची रणनीती आखली. याप्रकरणी डि.डि.आर नेमका काय निकाल निर्णय घेणार हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सहा मिटींगला गैरहजर, म्हणुन अपात्रतेचा निर्णय
संस्थेची मासिक मिटींग दर दोन महीन्यांनी होत असते.संचालक अॅड.देविदास काळे सलग सहा मिटींगला अनुपस्थीत आहे. सभेला न येण्याचे कारण कळवले नाही. मिटींगच्या पुर्वसुचना त्यांना देण्यात आल्या आहे. नुकत्याच झालेल्या मासिक मिटींगमध्ये नाईलाजाने संचालक पदावरून अपात्र ठरविण्याचा निर्णय उपविधीत नमुद नियमानुसारच घेण्यात आला आहे. अशी माहीती अध्यक्ष आशिष खुळसंगे यांनी आज दि. 5 डिसेंबर रोजी आयोजित पत्रकार परीषदेत दिली आहे.
कारणे दाखवा नोटीस देणे अनिवार्य
संस्थेच्या उप विधीत बऱ्याच सुधारणा करण्यात आल्या आहे. उप विधीनुसार कामकाज चालवणे गरजेचे आहे. मारेगाव येथील प्रतिनीधीला संचालक म्हणुन घेण्यास विरोध केला आहे. नियमबाहय कामाला माझा नेहमीच विरोध असतो. या कटकारस्थानाचा कर्ताधर्ता वेगळाच आहे. इन मिन तीन लोकांनी एकत्र येत निर्णय घेता येत नाही. अपात्रतेच्या कारवाईसाठी अगोदर कारणे दाखवा नोटीस देणे अनिवार्य आहे. मला वैयक्तीकरित्या मासिक सभे बाबतची कोणतीही नोटीस मिळाली नाही.अॅड. देविदास काळे,
संचालक तथा माजी अध्यक्ष
वसंत जिनींग सहकारी संस्था वणी