अन…. स्मशानभूमीत आलेले लोकं वाट मिळेल तिकडे पळत सुटले
भंडारा / नवप्रहार मिडिया
कुठे शुकशुकाट असला की त्याठिकाणी स्मशान शांतता होती असा शब्द प्रयोग केला जातो. पण प्रत्यक्ष स्मशानात जर धावपळ माजली तर त्याला काय म्हणावे ? स्मशानात धावपळ।मजल्याच्या प्रकार भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील हरदोली गावात भलताच प्रकार घडला आहे.येथे मृतदेहावर अंत्य संस्कार करण्यासाठी आलेल्या लोकांना पळताभुई थोडी झाली होती.अंत्ययात्रेत आलेले लोक मिळेल तिकडे सुसाट धावत सुटले होते. कारण या लोकांवर मधमाश्यानी हल्ला चढवला होता.
या गावातील मोराती कबल गायधने यांचं वयाच्या 69व्या वर्षी निधन झालं होतं. त्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी नातेवाईक, गावकरी आणि पंचक्रोशीतील मित्र परिवार आला होता. गायधने यांच्या अंत्ययात्रेला मोठी गर्दी जमली होती. हरदोली येथील त्यांच्या घरापासून अंत्ययात्रा काढण्यात आली. गावातीलच स्मशानभूमीत ही अंत्ययात्रा नेण्यात आली. त्यानंतर रितीरिवाजा प्रमाणे अंत्यसंस्काराचा विधी सुरू झाला. सर्वजण शोकाकूल वातावरणात या विधीत सामील झाले होते. अत्यंत शांततेत हा कार्यक्रम सुरू होता. विधीनंतर मृतदेहाला अग्नी देण्यात आला. त्यामुळे धूर निर्माण झाला अन् इतक्यात अचानक मधमाशांनी हल्ला केला. मधमाशांचा हल्ला होताच अंत्ययात्रेला आलेले लोक भयभीत झाले.
वाट दिसेल तिकडे धावत सुटले
मोठ्या प्रमाणावर मधमाशांनी हल्ला सुरू केल्याने सर्वचजण घाबरले. त्यामुळे मृतदेह स्मशानभूमीतच सोडून सर्वच लोक तिथून पळाले. जो तो जीव मुठीत घेऊन पळत होता. दिसेल तिकडे लोक सैरावैरा धावत होते. कुणी शेतात पळाले, तर कुणी गावाच्या दिशेने, कुणी झाडावर चढलं. तर कुणी पाण्याच्या दिशेने पळाले. जीव वाचवण्यासाठी लोक नुसते धावतच होते. अवघ्या मिनिटभरात स्मशानभूमीत शुकशुकाट पसरला होता. या धावपळीत अनेकजण पडले. अनेकांना मुक्का मार लागला. मधमाशांचा हल्ल्यात 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले.
धुरामुळे मधमाशांचा हल्ला
दरम्यान, स्मशानभूमीच्या बाजूला असंख्य झाडी आहेत. या झाडांवर मधमाशांची पोळं आहेत. मृतदेहाला अग्नी देताच जाळ आणि धूर निर्माण झाला. धुराचे लोट सर्वत्र पसरले. त्यामुळे मधमाशाही पोळावरून उठल्या आणि त्यांनी स्मशानभूमीतील नागरिकांवर हल्ला केला, अशी माहिती सूत्रांनी दिली.