वाळू चोरट्यांवर कारवाई करा – सहा. जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे
सोलापूर / प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील बेकायदेशीर वाळू चोरी रोखण्यासाठी भरारी पथके तैनात;
सोलापूर जिल्ह्यातील बेकायदा वाळू या गौण खनिजांची चोरी रोखण्यासाठी भरारी पथक तैनात करावेत. चोरी करणाऱ्यांवर अधिसूचनेच्या तरतुदीनुसार संबंधितांवर दंडात्मक व फौजदारी स्वरूपाची कारवाई करावी, असे निर्देश सहायक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिले आहेत.
उपविभागीय अधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत हे निर्देश दिले. यावेळी अक्कलकोट तहसीलदार मंद्रुपचे अपर तहसीलदार, दक्षिण सोलापूरचे तहसीलदार, मंडल अधिकारी उपस्थित होते.
केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालयाने वेळोवेळी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय व हरित लवादाचे निकष यांचे अवलोकन करता गौण खनिजाच्या उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे.
शासनाचा महसूल बुडत असल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. अशा प्रवृत्तींना आळा बसविण्यासाठी विघातक कृत्यांना आळा घालण्याकरिता भरारी पथक नेमण्याचे निर्देश दिले.
बैठकीमध्ये अवैधरित्या होत असलेल्या वाळू या गौण खनिजाच्या उत्खनन, वाहतूक व साठ्याबद्दल आढावा घेण्यात आला.
दरम्यान, मनीषा आव्हाळे यांनी गौण खनिज चोरीची स्थळे शोधून काढण्याचे आदेश दिले. शिवाय त्या ठिकाणी मंडल अधिकारी, तलाठी, पोलिस पाटील यांच्या संयुक्त स्थिर पथके,
भरारी पथके तैनात करण्याबाबत निर्देश दिले. पथकाकडून गौण खनिजांची चोरी करणाऱ्यांवर दंडात्मक व मुद्देमाल जप्तीची कारवाई करण्याबाबत आदेश.