लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नियंत्रण कक्ष सुरू
निवडणूक सहाय्यता केंद्राच्या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन
प्रतिनिधि
आशिष इझनकर
वर्धा : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने पूर्ण तयारी करण्यात आली असून माहितीची देवाणघेवाण सुलभ करण्यासाठी आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान सामान्य जनतेच्या निवडणुकीशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
नागरिकांनी निवडणूक विषयक सामान्य चौकशी आणि विविध तक्रारींसाठी निवडणूक सहाय्यता केंद्राच्या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा 8- वर्धा लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
नुकताच निवडणूक आयोगाने लोकसभा 2024 कार्यक्रम जाहीर केला असून वर्धा लोकसभा मतदार संघात आदर्श आचार संहिता लागू करण्यात आली आहे. त्यानुसार वर्धा लोकसभा मतदार संघात दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. आदर्श आचार संहितेचे उल्लंघन होत असल्यास नागरिकांना निवडणूक विभागाकडे तक्रार करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असलेल्या या नियंत्रण कक्षामध्ये दहा दुरध्वनी क्रमांक कार्यान्वित करण्यात आले आहे.
नियंत्रण कक्षाचे दुरध्वनी क्रमांक (07152)-254060,254061,254062,254063, 254064, 254065, 254066, 254067, 254068, 254069 हे दहाही दुरध्वनी क्रमांक व 1950 हा हेल्प लाईन क्रमांक निवडणुकीच्या काळात 24 तास कार्यरत असणार आहे. लोकसभा निवडणूक संबंधी सामान्य चौकशी आणि विविध तक्रारी नियंत्रण कक्षात नोंदविता येतील, असे निवडणूक विभागाने कळविले आहे.