क्राइम
ती करत होती मदतीची याचना पण तिने दिली कुंटणखान्याच्या मालकिणीला सूचना

पुणे / विशेष प्रतिनिधी
मदतीची याचना घेऊन फरासखाना ठाण्यात आलेल्या बांगलादेशी तरुणीला पुन्हा कुंटणखाना चालविणाऱ्या मालकिनीच्या ताब्यात देण्यात आल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे. त्या महिला पोलिस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, सुमारे महिनाभरापूर्वी रात्रीच्या वेळी एक तरुणी फरासखाना पोलीस ठाण्यात आली होती. तिने कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस हवालदाराला आपण बांगलादेशी नागरिक असून बुधवार पेठ परिसरात आपल्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती दिली. तसंच आपली सुटका करून मदत करण्याची विनंतीही तिने केली.
हा सगळा प्रकार घडत असताना त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने मदत करण्याऐवजी संबंधित महिला पोलीस हवालदाराने त्या तरुणीला बुधवार पेठेतील शुक्रवार पेठ पोलीस चौकीत नेले. तेथे ती तरुणी ज्या कुंटणखान्यात काम करत होती, त्या कुंटणखाना मालकिणीला बोलावण्यात आलं. त्यानंतर महिला पोलीस कर्मचारी आणि कुंटणखाना मालकिणीमध्ये काही संशयास्पद बोलणी झाल्याचा आरोप आहे.
या चर्चेनंतर मदतीची अपेक्षा ठेवून पोलिसांकडे आलेल्या तरुणीला पुन्हा त्या कुंटणखाना मालकिणीच्या ताब्यात देण्यात आल्याचं समोर आलं आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस विभागात खळबळ उडाली. या प्रकरणाची चौकशी करण्यात आली असता कर्तव्यात गंभीर हलगर्जीपणा आणि बेजबाबदारपणा झाल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर फरासखाना पोलिस ठाण्याच्या तपास पथकात नेमणुकीस असलेल्या महिला पोलिस हवालदार मनिषा पुकाळे यांना निलंबित करण्यात आले.
कोम्बिंग ऑपरेशनमध्ये ४ अल्पवयीन मुलींची सुटका
हा सगळा प्रकार पोलीस अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर 10 फेब्रुवारी रोजी पुणे पोलिसांनी बुधवार पेठ भागामध्ये कोम्बिंग ऑपरेशन करत मोठी कारवाई केली. कारवाईदरम्यान ४ अल्पवयीन मुलींची बुधवार पेठेतून पोलिसांनी सुटका केली आणि या सगळ्या प्रकरणाचा पोलीस तपास करीत आहे.




