राजकिय

रिसीमन विधेयकाच्या बाजूने शरद पवार गट  ?

Spread the love

परिसीमन विधेयकाच्या बाजूने शरद पवार गट  ? काँग्रेस ने उपकाराची करून दिली आठवण 

मुंबई / विशेष प्रतिनिधी 

 केंद्रीय मंत्रिमंडळाने मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर ते विधेयक आता संसदेत मांडण्यात येणार आहे. हे विधेयक मंजूर होण्यासाठी भाजपप्रणित एनडीए सरकारला काही खासदारांची गरज आहे आणि त्यामुळेच शरद पवारांची राष्ट्रवादी आणि तामिळनाडूतील डीएमकेच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीने आता या विधेयकाला पाठिंबा देण्याची पूर्ण तयारी केल्याची चर्चा आहे. त्यावरून आता काँग्रेसने पवारांच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवलं आहे. ज्या शरद पवारांना 85 व्या वर्षी राज्यसभेवर पाठवण्यासाठी काँग्रेसने आपला दावा सोडला आणि त्यांना शेवटपर्यंत साथ दिली, तेच आता भाजपला पाठिंबा देणार आहेत, अशी पोस्ट महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने केली आहे.

मतदारसंघ पुनर्रचना विधेयक मंजूर करण्यासाठी भाजपला शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या लोकसभेतील आठ खासदारांची गरज आहे. गेल्या काही दिवसांपासून सुप्रिया सुळेंनीही या मुद्द्यावरून त्यांची भूमिका बदलल्याचे संकेत दिले आहेत. त्यातच पक्षाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावरून भूमिका स्पष्ट केली.

मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षणाच्या विधेयकावरून आपल्या पक्षाने सरकारला पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला असल्याचं जितेंद्र आव्हाड म्हणाले. महत्त्वाचं म्हणजे जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांची रुग्णालयात भेट घेतल्यानंतर, त्यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ही भूमिका स्पष्ट केली.

एकीकडे जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाची ही भूमिका स्पष्ट केली असली तरी त्यांच्या पक्षाचे खासदार मात्र यावर स्पष्ट बोलायला तयार नाहीत. या विधेयकावरून अद्याप निर्णय झाला नसून सगळे खासदार एकत्र बसून निर्णय घेऊ, असं खासदार सांगत आहेत.

त्या आधी, खासदार सुप्रिया सुळे यांनी या मुद्द्यावरून सरकारला पाठिंबा द्यायचे संकेत दिले होते. सरकारने जर सरसकट 50 टक्के जागा वाढवण्याच्या विरोधकांच्या मुद्द्याचा विचार केला तर आपण विचार करू असं त्या म्हणाल्या होत्या. आता केंद्र सरकारने विरोधकांची मागणी मान्य करून सरसकट 50 टक्के जागा वाढवण्याचं स्पष्ट केलं आहे.

दुसरीकडे, काँग्रेसने या मुद्द्यावरून भाजपला विरोध केला आहे. सरकार महिला आरक्षणाच्या आडून हे विधेयक आणत आहे. तसेच भविष्यातील राजकीय फायद्यासाठी भाजपकडून मतदारसंघ पुनर्रचना केली जाणार आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. त्याचवेळी काँग्रेसने शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या भूमिकेवरही नाराजी व्यक्त केली आहे.

 काय म्हटलंय काँग्रेसने?

शरद पवार साहेबांना वयाच्या 85व्या वर्षी पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यासाठी काँग्रेस पक्ष शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला होता…

मार्च 2026 मध्ये महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक होणार होती. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडे अवघे 10 आमदार होते. एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी 36 मतांची आवश्यकता होती. काँग्रेसकडे 16, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे 20 आमदार होते.

सुप्रिया सुळे यांनी शरद पवार साहेबांच्या उमेदवारीसाठी काँग्रेस नेतृत्वाकडे पाठिंबा मागितला. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी कोणतेही आढेवेढे न घेता सकारात्मक भूमिका घेतली. काँग्रेसने स्वतःच्या जागेवरील दावा बाजूला ठेवत शरद पवार साहेबांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. त्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षानेही त्यांना पाठिंबा दिला आणि महाविकास आघाडीने एकमताने त्यांची उमेदवारी निश्चित केली.

आणि आता काय?

परिसीमन कायद्याच्या पार्श्वभूमीवर तेच शरद पवार साहेब, सुप्रिया सुळे ताई आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष भाजप सरकारला पाठिंबा देणार आहेत.

काँग्रेसने शरद पवार, सुप्रिया सुळेंचा उल्लेख करून केलेली ही पोस्ट आता चांगलीच चर्चेत आली आहे. यावर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते काय प्रतिक्रिया देतात याकडे लक्ष लागलं आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close