अमरावतीला वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या प्रस्तावास मुख्यमंत्र्यांची मान्यता
अमरावतीकरांना नियमित व मुबलक जलापूर्तीसाठी आ.सौ.सुलभाताई खोडके यांची विधिमंडळात लक्षवेधी
केंद्र शासनाकडे शिफारस करण्याचे मुख्यमंत्री महोदयांच्या वतीने ना. उदय सामंत यांचे आश्वासन
*मुंबई २५ मार्च* : अमरावती शहराला अप्पर वर्धा धरणातून पाणी पुरवठा केला जात असून अमरावतीकरांची तहान भागेल इतका पाणीसाठा धरणात उपलब्ध आहे. तरी अमरावतीकरांना एक दिवस आड पाणी पुरवठा मिळत असल्याने
अपुऱ्या व अर्धवट पाणी पुरवठ्याची झळ सहन करावी लागते आहे. अप्पर वर्धा धरण मोर्शी ते नेरपिंगळाई पर्यंतची डब्लूटीपी पाईप लाईन जुनी लोखंडी असून शिकस्त झाली असून पाईप लाईन फुटली तर अमरावतीचा पाणी पुरवठा पाच दिवस बंद राहतो असे चित्र आहे. या कारनाणे आसपासच्या गावाला सुद्धा पाणी पुरवठा होत नाही. ही गैरसोय टाळण्यासाठी अमरावती वाढीव पाणी पुरवठा योजना अमृत २.० अभियाना अंतर्गत सिंभोरा हेडवर्क्स ते नेरपिंगळाई संतुलन टाकी पासून पुढे तपोवन जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत मृदू पोलादी जलवाहिनी अंथरणेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. ८८०.६८ कोटीच्या प्रस्तावास मान्यता देऊन लवकरात लवकर कामाला सुरुवात करण्यात यावी, अशी लक्षवेधी मागणी अमरावतीच्या आ.सौ. सुलभाताई संजय खोडके यांनी राज्य विधिमंडळात लावून धरली.
राज्य विधी मंडळाच्या अर्थ संकल्पीय अधिवेशनात कामकाजा दरम्यान लक्षवेधी क्रमांक ६ वर बोलतांना आ.सौ. सुलभाताई खोडके यांच्या कडून अमृत २.० अभियान अंतर्गत अमरावतीच्या वाढीव पाणी पुरवठा योजना संदर्भात सभागृहाला अवगत करण्यात आले होते.
अमरावती पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत राबविण्यात येत असून योजनेचा मुख्य जलस्रोत मोर्शी येथील अप्पर वर्धा धरणाचा जलाशय आहे.
सध्याच्या अंथरलेल्या १५०० मिलीमीटर व्यासाच्या पी.एस.सी. गुरुत्ववाहिनीवर सातत्याने गळतीचे प्रमाण वाढत आहे. सदर गळत्या ह्या मुख्यत्वेकरून पाईप मधील तार गंजल्यामुळे व पाईप निकामी झाल्याने लागल्या आहेत. या कारणाने होत असलेली एक गळती दुरुस्तीसाठी अमरावती शहराचा पाणी पुरवठा कमीत कमी तीन ते पाच दिवस खंडित होतो. या कारणाने शहरातील नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होतो . सद्या अस्तित्वातील जुनी पी.एस.सी. गुरुत्ववाहिनी १५६ दशलक्षलिटर प्रतिदिन करिता संकल्पीत असून त्यामधून सद्यास्थितीला १२३ दशलक्ष लिटर प्रतीदिन पाणी पुरवठा करण्यात येत आहे. सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात जवळ जवळ ४ मोठ्या स्वरूपाच्या गळत्या झाल्या . व एक गळती दुरुस्तीला साहित्यासह रुपये ६ ते ७ लक्ष खर्च लागला होता . तर जुन्या पी.एस.सी. गुरुत्ववाहिनी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केल्यास गळत्यांच्या प्रमाणात वाढ होऊ शकते . ही चिंतेची बाब असल्याचे आमदार महोदयांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले . त्यामुळे सदर जुनी पीएससी गुरुत्व वाहिनी ऐवजी नवीन (एम.एस. ) माईल्ड स्टील ऊर्ध्ववाहिनी पाईप लाईन टाकल्यास सन २०५५ च्या लोकसंख्येकरिता २६८ दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेकरिता पाणी पुरवठा सुलभ व सोयीने करणे शक्य होणार आहे. त्यामुळे याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे दोनदा सादर करण्यात आला. हा प्रस्तावाला मंजूरी कधी मिळेल का..? तसेच निधी बाबत तरतूद करणार का ? याबाबत शासनाकडून खुलासा करण्यात यावा. त्याचप्रमाणे एका महिन्यात प्रस्ताव मान्य करून केंद्र शासनाकडे याबाबत शिफारस करणार का ? अशी लक्षवेधी मागणी करीत आ.सौ.सुलभाताई खोडके यांनी सभागृह दणाणून सोडले.
*अमरावतीच्या जनतेकरिता भविष्यात नियमित व अखंडित जलापूर्तीचे व्हिजन*
सद्या अमरावती महानगराची लोकसंख्या लक्षात घेता अप्पर वर्धा धरणातून ४६ दशलक्षघनमीटर इतके वार्षिक पाण्याची मागणी तसेच ५८ दशलक्ष घनमीटर मंजूर आरक्षण आहे. अमरावतीची लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने शहराच्या चहूबाजूने रहिवासी क्षेत्र विकसित होत आहे. त्यामुळे शहराला मुबलक व नियमित पाणी पुरवठा व्हावा यासाठी अप्पर वर्धा धरणातून अधिक प्रमाणात पाणी आरक्षित होणे जरुरीचे आहे. भविष्यातील वर्ष २०५५ पर्यंतच्या लोकसंख्येचा विचार करता ४० दशलक्ष घनमीटर वाढीव पाणी आरक्षण प्रस्तावित केले आहे. याबाबत पाटबंधारे विभागाकडे वाढीव आरक्षण प्रस्ताव आलेला असतांना अद्यापही मंजुरी प्रलंबित आहे. तसेच अमृत २.० अभियान अंतर्गत अमरावती वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून सिंभोरा हेडवर्क्स ते नेरपिंगळाई संतुलन टाकी ते पुढे तपोवन जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत विविध स्थापत्य कामे, स्मार्ट वॉटर सिस्टम व इएसआर पर्यंत स्वयंचलित रित्या पाणी पुरवठा करणे अशी अनेक कामे सुद्धा प्रस्तावित आहे. अमरावती वाढीव पाणी पुरवठा योजनेसंदर्भात ही सर्व कामे अमृत २.० अभियानाच्या पोर्टलवर मांडून शासनाकडे प्रस्ताव देण्यात आला आहे. हा प्रस्ताव नविन योजना भविष्यातील अंदाजे लोकसंख्या विचारात घेऊन व प्रतिदिन २६८ दशलक्ष लिटर इतक्या पाण्याच्या मागणी वरून सादर करण्यात आला आहे. यासाठी ८८०.६८ कोटी इतका खर्च लागणार असल्याचे सुद्धा प्रस्तावात नमूद केले आहे. यासंदर्भात शासन दिलेला प्रस्ताव एका महिन्यात मान्य करणार का ? व संदर्भात केंद्र शासनाकडे शिफारस करणार का ? असा प्रश्न उपस्थित करून आ.सौ.सुलभाताई खोडके यांच्या कडून सभागृहात अमरावतीला वर्ष २०५५ पर्यंत नियमित व अखंडित जलापूर्तीचे व्हिजन मांडन्यात आले आहे .
*अमरावती करिता वाढीव पाणी पुरवठा योजनेसाठी केंद्र शासनाकडे शिफारस करण्याचे -मुख्यमंत्री महोदयांच्या वतीने ना. उदय सामंत यांचे विधिमंडळात उत्तर*
राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या कामकाजा दरम्यान सभागृहात मुख्यमंत्री महोदयांच्या वतीने उत्तर देतांना ना. उदय सामंत यांनी अमरावती वाढीव पाणी पुरवठा योजना अमृत २.० अंतर्गतच्या विविध प्रस्तावित व प्रगतीपथावरील कामांसंदर्भात माहिती दिली. सदर प्रकल्पाचे काम सद्यस्थितीत प्रगतीपथावर असल्याचे नामदार उदय सामंत यांच्या कडून सांगण्यात आले आहे. तसेच अमृत अभियानाच्या कामसंदर्भात बोलतांना त्यांनी सांगितले की सदर पाणी पुरवठा प्रकल्प अमृत 2.0 अभियानांतर्गत गठीत करण्यात आलेल्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय उच्चाधिकार सुकाणू समिती अथवा महाराष्ट्र सुवर्ण जयंती महाभियानांतर्गत गठीत राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समिती समोर सादर करण्यात येईल. असे उत्तर ना. उदय सामंत याच्या कडून देण्यात आले आहे. एका महिन्याच्या आत सुकाणू समितीची बैठक घेऊन त्या निर्णयानंतर अमृत २.० अभियानाबाबत केंद्र शासनाकडे शिफारस करून हा प्रस्ताव मंजूर करण्यासंदर्भात विनंती करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. आजच जर आपण महाराष्ट्र शासनाच्या पैशातून करण्या संदर्भात पाउल उचलले तर केंद्र शासनाला या नळपाणी योजनाबाबत अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या कारणा मुळे केंद्र शासनाच्या निर्णयानंतर योग्य निर्णय घेतला जाईल , असे नामदार उदय सामंत यांनी उत्तर देऊन आमदार महोदयांना आश्वासन दिले .