पालकांनो ! पाल्यांना संस्कारासह सुविधा द्या. श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ
प्रतिनिधी / वारी भैरवागढ
संस्काराशिवाय दिल्या जाणारी सुविधा हे स्वैराचाराच्या माध्यमातून पतनाला कारणीभूत होत असते . म्हणून एखाद्या वेळी आपल्या पाल्याला एखादी सुविधा आपण जर देऊ शकलो नाही तर ; तो कदाचित थोडा वेळ रडेलही परंतु त्याला जर संस्कार दिले नाही तर ; त्याच्याबरोबर आपल्याला सुद्धा प:श्चातापदग्ध होऊन आजन्म रडावेच लागेल. म्हणून आपल्या पाल्यांना सुविधा , संपत्ती , सत्तेचे हक्कदार बनविण्याआधी संस्काराचे वारसदार बनविले पाहिजे तरच ते उपरोक्त सकारात्मक गोष्टींचा स्वतःसह समाजोद्धाराकरिता सदुपयोग करून आपल्या कुळाला गौरवान्वित करतील . म्हणून पालकांनो ! आपल्या पाल्यांना संस्कारासह सुविधा द्या . असे कळकळीचे आवाहन भागवताच्यार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी केले.
ते आज श्री संत वासुदेवजी महाराज स्मृती मंदिर श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ येथे नाताळच्या सुट्टी निमित्ताने पर्यटन व दर्शनासाठी आलेल्या पालक व पाल्यांसी अनौपचारिक चर्चेदरम्यान मार्गदर्शन करीत असतांना बोलत होते. ते पुढे म्हणाले की शिक्षण ही काळाची तर , संस्कार ही जीवनाची गरज आहे. आज सभोवताली वातावरण स्पर्धात्मक शिक्षणाचे असल्यामुळे बालक शिक्षणाकरिता सहज प्रवृत्त होतात. परंतु संयुक्त कुटुंब हे विभक्त झाल्यामुळे संस्काराचे केंद्रबिंदू असणारे आजी आजोबा तसेच रक्तांच्या नात्यातील नातेवाईकांची वानवा असल्यामुळे संबंध मुलक प्रीती पेक्षा गौरव मूलक प्रीतीचाच बोलबाला दिसून येतो . त्यामुळे हिताहिताचा विचारविनिमय न होता केवळ स्वार्थाचाच विचार केला जात असल्याने देवाणघेवाण जोपर्यंत सुरळीत चालू आहे तोपर्यंतच ते नातेवाईक असतात . व त्यात काही कारणांनी अडचणी निर्माण झाल्यास ते नाते वाईट होण्याकरिता वेळ लागत नाही. म्हणून विभक्त कुटुंब पद्धतीतील पालकांनी स्वतःच्या बालकांच्या उज्वल भविष्याकरिता त्यांना सुविधा वा पैशापेक्षाही संस्कृती व संस्काराचे धडे तसेच वेळ सुद्धा देणे अधिक गरजेचे आहे. पूर्वी ह्या गोष्टी आजी-आजोबा वा गुरुकुल शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून बालकांना मिळत होत्या . त्यामुळे तो आदर्श माणूस बनवून समाजाप्रती कृतज्ञता पूर्वक व्यवहार करीत होता. आता मात्र ” हम दो हमारे दो और दादा दादी निकाल दो ” या अघोषित विचारप्रणाली व धर्मनिरपेक्ष शिक्षण पद्धतीमुळे शाळा महाविद्यालयातून हे संस्काराचे शिक्षण मिळणे दुरापास्त झाले आहे. म्हणून आता माता पिता किंवा उन्हाळी बालसंस्कार शिबिर हेच दोन पर्याय उपलब्ध आहेत. केवळ दोन बालकांचे जन्मदाते होणे हेच आपल्या पुरुषार्थाचे प्रशस्तीपत्र मानणाऱ्या पालकांकडे सुद्धा संस्काराची शिदोरी नसल्यामुळे ते आपल्या बालकांना देण्याकरिता स्वतःच असमर्थ आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस समाज व्यवस्था अत्यधिक खिळखिळी होऊ पाहत आहे. म्हणून बालसंस्कारा शिवाय दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक नाही. किंबहुना बरेचदा पर्याय हेच परंपरेच्या ऱ्हासाला कारणीभूत झाले आहेत . करिता आपण देत असणारे पर्याय सुद्धा त्यात भर टाकण्याकरिता कारणीभूत होणार नाहीत याची खबरदारी पालक तथा तथाकथित समाज सुधारकांनी घेऊन, देश , धर्म व संस्कृती रक्षणाकरिता सामूहिक प्रयत्न करण्याची नितांत गरजही त्यांनी यावेळी बोलून दाखविली. त्यांच्या मार्गदर्शनातील पोटटिळक पाहून अनेक पालकांनी १ l ५ ते २० l ५ l २०२५ या कालखंडामध्ये होऊ घातलेल्या श्री माऊली सर्वांगीण विकास बालसंस्कार शिबिरा करिता आपल्या पाल्यांच्या नावांची नोंद सुद्धा आज पासूनच महाराजांकडे केल्याचे श्री ज्ञानेश्वर महाराज भालतिलक हे कळवितात.