फेसबुक आणि इन्स्टाग्राम वरील प्रेमात पडून संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर असलेल्या तरुणीला भरोसा सेल ची साथ
नागपूर / नवप्रहार मीडिया नेटवर्क
अँड्रॉइड मोबाईल आल्यापासून तरुणाई कुटुंबापेक्षा फेसबुक आणि इन्स्टाग्राम सारख्या शोसल मीडिया साईट वर आपला जास्त वेळ घालवतात. आणि अनोळखी व्यक्तीच्या प्रेमात पडतात.त्यानंतर लग्नाचा निर्णय घेतात. खरं तर सोशल मीडियाचा सामाजिक उपयोगा पेक्षा वैयक्तिक उपयोग जास्त होत आहे. आणि यामुळे अनेक संसार उध्वस्त होत आहेत. उपराजधानी मधून अशीच एक घटना समोर येत आहे.पण भरोसा सेल ने ब्रेनवॉश केल्यावर मात्र एक संसार तुटण्या पासून वाचला.
या विचित्र प्रकरणा बाबत अधिक माहिती अशी की एका तरुणीची फेसबुकवरून एका युवकाशी ओळख झाली…दोघांत संवाद सुरू झाला…सलग संवादातून प्रेम फुलले…. लग्नाचा निर्णय झाला…. अक्षता पडल्या, सुखी संसार सुरू झाला. त्यांच्या संसारवेलीवर एक गोड फुलही उमलले…. मात्र, याच दरम्यान तरुणीची ओळख इंस्टाग्रामवरील आणखी एका तरुणाशी झाली…. त्याच्या प्रेमात वेडी झालेल्या तरुणीने पतीला सोडून त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला….या त्रिकोणी प्रेमकथेमुळे एक सुखी संसार उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठयावर पोहोचला.
अखेर ‘भरोसा सेल’ने मध्यस्थी करीत या त्रिकोणी प्रेमकथेतील तिघांनाही त्यांच्या चुकांची जाणीव करून दिली आणि विस्कटू पाहणारी नात्यांची वीण पुन्हा जोडली गेली…
कळमना परिसरात राहणारी २० वर्षीय तरुणी स्विटी (काल्पनिक नाव) हिची फेसबुकवरून एका रजत नावाच्या युवकाशी ओळख झाली. तो मूळचा उत्तरप्रदेशचा होता. नंतर दोघांनाही प्रेम झाले. रजतने स्विटीच्या प्रेमासाठी घर सोडून थेट नागपूर गाठले. दोघांनी कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला. रजत हा बांधकामावर मिस्त्री म्हणून कामाला जाऊ लागला तर स्विटीही कपड्याच्या दुकानात काम करीत होती. त्यांना वर्षभरातच बाळ झाले. घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र, इंस्टाग्रामने सुखी संसारात विघ्न आणले. स्विटीची ओळख इंस्टाग्रामवरून भाजीविक्रेता अभिजीतशी झाली. ते दोन महिने एकमेकांशी इंस्टाग्रामवर बोलत होते. एकमेकांना छायाचित्र पाठवत होते. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. पती कामावर गेल्यानंतर दोघांच्या भेटी व्हायला लागल्या. स्विटीला पतीपेक्षा अभिजीत आवडायला लागला. दोघांनी प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला.
‘माझे अभिजीतवर प्रेम आहे. मला त्याच्याशी लग्न करायचे आहे. त्यामुळे घटस्फोट हवा आहे,’ असे स्विटीने पती रजतला सांगितले. चिमुकल्या बाळाचा विचार न करता पत्नी प्रेमात पडल्यामुळे रजतच्या पायाखालची जमीनच सरकली. घटस्फोट न दिल्यास पोलिसात तक्रार देण्याची धमकीसुद्धा स्विटीने दिली. आई-वडिलांना सोडून स्विटीसाठी नागपुरात आलेला रजत संभ्रमात पडला.
…अन् गुंता सुटला रजतने घटस्फोट देण्यास नकार दिला तर तिकडे अभिजीतने स्विटीशी लग्न करण्याची तयारी केली. नात्यातील गुंता सुटत नसल्यामुळे पती,पत्नी अन् प्रियकर तिघेही भरोसा सेलमध्ये पोहचले. ‘भरोसा सेल’ने मध्यस्थी करीत या त्रिकोणी प्रेमकथेतील तिघांनाही त्यांच्या चुकांची जाणीव करून दिली आणि विस्कटू पाहणारी नात्यांची वीण पुन्हा जोडली गेली… तिघांनीही आपापला निर्णय सांगितला. पोलीस निरीक्षक सीमा सुर्वे यांनी तिघांचेही समूपदेशन केले. स्विटीला पती आणि संसाराचे महत्व पटवून दिले. तर अभिजीतला भविष्याबाबत विचार करण्याचा सल्ला दिला. तो त्यांना पटला.