कामगाराचा मृतदेह रस्त्यावर सापडल्याने खळबळ

बीड / प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील कथित हप्ता वसुली उघड झाली आहे. अश्यातच आता देशमुख यांच्या हत्येमुळे चर्चेत असलेल्या अवादा एनर्जी कंपनीतील एका कामगाराचा मृतदेह रस्त्यावर सापडल्याने हा घातपात की अपघात या चर्चेला पेव फुटले आहे.
नेमकी घटना काय?
पंजाब राज्यातील हा कामगार केज तालुक्यातील मस्साजोग येथील अवादा एनर्जी या पवन ऊर्जा कंपनीत मजूर म्हणून काम करीत होता. त्याचे नाव रचपाल हमीद मसीह असून तो पंजाब राज्यातील गुरुदासपूर येथील रहिवासी आहे.
केज शहरातील केज-अंबाजोगाई रोडवर असलेल्या बारसमोरच मृतदेह रस्त्यावर पडला असल्याचे आढळून आले. केज पोलिसांनी हा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ताब्यात घेतला आहे. आता या प्रकरणाचा तपास केज पोलीस करत आहेत.
अवादा कंपनीतील या कामगाराचा नेमका मृत्यू कशाने झाला याबाबत मात्र गूढ कायम आहे. दरम्यान, या घटनेप्रकरणी आता पोलिसांनी देखील चौकशी सुरू केली. त्यामुळे आता या कामगाराचा नेमका कसा आणि कशामुळे मृत्यू झाला याचं कारण शोधण्याचं मोठं आव्हान बीड पोलिसांसमोर आहे.
अवादा कंपनीकडे वाल्मिक कराडने मागितलेली 2 कोटींची खंडणी
पवन उर्जा निर्माण करणारी अवादा कंपनी ही बीडमध्ये आहे. याच कंपनीकडे तब्बल 2 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप हा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर आहे.
दरम्यान, याच सगळ्या खंडणी प्रकरणाच्या वादातून मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर निर्घृण हत्या करण्यात आली होती. ज्यानंतर या संपूर्ण घटनेबाबत भाजप आमदार सुरेश धस यांनी थेट विधानसभेत आवाज उठवला. त्यानंतर या सगळ्या प्रकरणातील राजकीय बाजूही समोर आली.
दुसरीकडे अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे खंडणी मागितल्या प्रकरणी वाल्मिक कराड याच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे या प्रकरणी कराड हा पोलिसांना शरण आला होता. पण त्यानंतर SIT ने वाल्मिक कराड याला संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी करून त्याच्यावर मकोका लावला आहे.
दरम्यान, या सगळ्या प्रकरणात वाल्मिक कराड याला अटक करण्यात आल्यापासूनच राज्यातील कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी ही सातत्याने केली जात आहे. मात्र, अद्याप तरी त्यांचा राजीनामा घेण्यात आलेला नाही.