हातमोजे बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग ; सहा कामगारांचा होरपळून मृत्यू

छत्रपती संभाजीनगर / नवप्रहार मिडिया .
छत्रपती संभाजी नगर येथून एक मन हेलावून टाकणारी बातमी समोर येत आहे. येथील वाळूज एमआयडीसी परिसरात असलेल्या हात मोजे (Hand Gloves) बनवणाऱ्या कंपनीला लागलेल्या भीषण आगीत सहा कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कामगार झोपेत असतांना ही घटना घडल्याचे समजते. वाळूज औद्योगिक परिसरातील हँडग्लोज बनवणाऱ्या सनशाईन एंटरप्राईज कंपनीला आग लागली. या आगीत 6 कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर, 4 कामगारांनी स्वतःचा जीव वाचवला.
वाळूज औद्योगिक परिसरात सनशाईन एंटरप्राईज सी 216 या हँडग्लोज बनवणाऱ्या कंपनीमध्ये सुमारे 20 ते 25 कामगार काम करतात. 10 कामगार कामगार कंपनीमध्ये राहतात. सगळे झोपेत असताना अचानक आग लागली. काही झोपलेल्या कामगारांना गरम वाफ लागल्याने जाग आली, तेव्हा त्यांना आग लागल्याचं दिसलं. यानंतर जीव वाचण्यासाठी कामगारांची पळापळ सुरु झाली.
कंपनीतून बाहेर पडण्याच्या ठिकाणी आग लागल्याने आतमध्ये असलेल्या कामगारांना बाहेर पडणं शक्य नव्हतं, पण काही कामगारांनी पत्र्यावरून एका झाडाच्या साहाय्याने सुखरुप बाहेर पडण्यात यश मिळवलं. भल्ला शेख, कौसर शेख, इक्बाल शेख, मगरुफ शेख आणि अन्य दोन मिर्झापूर या सहा कामगारांचा आगीत होरपळून आणि गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला.
आगीतून सुखरूप बचावलेला कामगार अली अकबर याने घडलेला प्रकार सांगितला. अली अकबरने सांगितलं की, ”काम बंद करून आम्ही झोपी गेलो होतो. मध्यरात्री आम्ही पांघरून घेऊन झोपलो असता, आम्हाला गरमी झाल्याने जाग आली. आगीच्या वाफेमुळे गरम होऊन जाग आली आणि आजूबाजूला पाहतो तर सगळीकडे आग पसरली होती. आम्ही आरडाओरड करत इतरांना जाग करण्याचा प्रयत्न केला. कंपनीतून बाहेर पडण्याच्या दरवाजाच्या बाजूने आग लागल्याने आगीतून बाहेर पडणं कठीण झालं होतं. त्यानंतर दरवाजाच्या बाजूने आग लागल्यामुळे कामगारांनी वरती चढून पत्र्यावरून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. चार जण सुखरुप बाहेर पडले.”