खेळ व क्रीडा
कोहली तडकाफडकी मायदेशी परतल्याने चाहत्यांची चिंता वाढली
मुंबई / क्रीडा प्रतिनिधी
सध्या टीम इंडिया साऊथ आफ्रिकेच्या दौऱ्यावर असून येथे ते टी 20, वनडे आणि टेस्ट सिरीज खेळणार आहेत. यापैकी टी 20 आणि वनडे सिरीज पूर्ण झाली असून वनडे सिरीजमध्ये टीम इंडियाचा विजय झाला आहे. आत 26 डिसेंबर पासून भारत विरुद्ध साऊथ आफ्रिकेमध्ये टेस्ट सीरिजला सुरुवात होणार असून यात वर्ल्ड कपनंतर काही काळ विश्रांती घेतलेले रोहित शर्मा आणि विराट कोहली सारखे अनेक दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर परतणार आहेत. परंतु असे असताना या टेस्ट सीरिजसाठी टीम इंडिया सोबत साऊथ आफ्रिकेला गेलेला विराट कोहली तडकाफडकी भारतात परतला आहे.
26 डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सिरीजमधून यापूर्वीच ईशान किशन वैयक्तिक कारणांमुळे तर मोहम्मद शमी दुखापतीच्या कारणांमुळे बाहेर पडले आहेत. तर आता विराट कोहली देखील टीम इंडियाला सोडून भारतात परतल्याने भारतीय क्रिकेट प्रेमींच्या चिंता वाढू लागल्या आहेत. 26 ते 30 डिसेंबर दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा पहिला टेस्ट सामना खेळवला जाणार असून यासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 15 डिसेंबर रोजी साऊथ आफ्रिकेला रवाना झाली होती. या सिरीजमध्ये वर्ल्ड कप नंतर विश्रांती घेतलेले रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह सारखे स्टार खेळाडू मैदानावर परतणार आहेत.
टेस्ट सीरिजसाठी टीम इंडिया साऊथ आफ्रिकेमध्ये सराव करत असताना विराट कोहली कौटुंबिक कारणास्तव भारतात परतला आहे. विराट कोहली भारतात परतल्याची माहिती मिळताच क्रिकेट चाहते विराट साऊथ आफ्रिके विरुद्ध पहिल्या टेस्ट सिरीजमध्ये खेळणार की नाही याबाबत शंका उपस्थित करीत होते. परंतु सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विराट कोहली हा तीन दिवसांपूर्वी भारतात परतला असून तो आज 22 डिसेंबर रोजी पुन्हा साऊथ आफ्रिका दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. तसेच तो जोहान्सबर्ग येथे होणाऱ्या पहिला टेस्ट सामन्यासाठी हजर असेल.


