अखेर डिजिटल स्वाक्षरी दोष सुधारला
एस.डी.ओ ने १५०० वर प्रकरणे लावली मार्गी.
*वरूड/तूषार अकर्ते*
मोर्शी उपविभागीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना व पालकांना उपविभागीय कागदोपत्री कार्यालयाच्या कामकाजाकरिता सतत पायऱ्या झिजवाव्या लागत होत्या. कारण एसडीओच्या डिजिटल स्वाक्षरी प्रक्रियेत तांत्रिक दोष उद्भवल्याने गेल्या काही दिवसांपासून शेकडो प्रकरणे तुंबली होती.अखेर हा तांत्रिक दोष हटविण्यात आला असून उपविभागीय अधिकाऱ्यांनी १५०० च्या वर प्रकरणे मार्गी लावली आहेत.गत २६ जूनपासून मोर्शीच्या
उपविभागीय अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी प्रक्रियेतील तांत्रिक अडचणीमुळे वरूड मोर्शी तालुक्यातील सेतू सुविधा केंद्रांतील हजारो जाती प्रमाणपत्रे, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट अडचणीत सापडले होते. परिणामी हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात होती. तसेच विविध विभागांच्या भरती प्रक्रियेकरिता अर्ज करणारे विद्यार्थी सुद्धा चांगलेच अडचणीत सापडले होते. शैक्षणिक निकाल जाहीर होताच पुढील प्रवेशाकरिता असणारे आवश्यक दाखले मिळवण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांची धडपड सुरू असतानाच प्रशासनाच्या तांत्रिक अडचणीमुळे त्यात खोळंबा झाला आणि प्रशासना विरुद्ध सर्वत्र रोष दिसू लागला. काही दिवसांपासून विद्यार्थ्यांची कागदपत्रांकरिता गर्दी वाढू लागली आणि त्यात एसडीओच्या दालनात डिजिटल स्वाक्षरीमध्ये तांत्रिक दोष उद्भवला. परिणामी शेकडो प्रकरणे रखडली होती. मात्र या तांत्रिक दोषाचे १३ जुलैला निराकरण करण्यात आल्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्यांनी १५०० च्या वर प्रकरणांवर स्वाक्षऱ्या करून हा प्रश्न मार्गी लावला. याबाबत उपविभागीय अधिकारी प्रदीपकुमार पवार यांनी स्वतः तरुण भारत शी बोलून हा प्रश्न मार्गी लागल्याची माहिती दिली.