जिवक बुद्ध विहारात संगीतमय बुद्ध सकाळ व प्रबोधन कार्यक्रम संपन्न
धामणगाव रेल्वे: स्थानिक पुष्करणा नगर येथील बुद्ध विहाराच्या प्रांगणामध्ये बुद्ध जयंतीच्या निमित्ताने संगीतमय बुद्ध सकाळ हा गायनाचा सुरेल कार्यक्रम प्रजापती महिला मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. ‘साऱ्या विश्वाला बुद्ध हवा…, ये बुद्ध की धरती…, बुद्धं शरणं गच्छामी.
…’ या सारख्या अनेक बहारदार गीतांनी धामणगाव वासियांना बुद्धमय केले. यामध्ये प्रजापती महिला संघाच्या सन्मा. अलकाताई डोंगरे, वंदनाताई इंगळे, वंदनाताई दहाट, मीना भगत, हेंडवेताई, अभ्यंकर ताई, प्रतिभाताई खंडारे, रुपालीताई शंभरकर, प्रतिभाताई नगराळे, चैताली खडसे, वैशाली नारे, पुजाताई भगत ई. सदस्यांनी आपल्या गीतातून भ. बुद्धास वंदन केले व समस्त भारतीयांना बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा दिल्यात तर आरव मेश्राम या छोट्या मुलाने जपानी भाषेत बुद्धवंदना गावून प्रेक्षकांची मने जिंकली.या कार्यक्रमाचे उत्कृष्ट आणि प्रभावी सूत्रसंचालन सन्मा. शिल्पा मनोहर व करुणा शेंडे यांनी केले.
यानंतर झालेल्या प्रबोधन कार्यक्रमात अमरावती वरून आलेल्या सन्मा. पी. एन. चव्हाण व नरेंद्र सुखदेवे यांनी बुद्धाच्या जीवन व कार्यावर आपल्या प्रबोधनातून प्रकाश टाकला तसेच मा. पंकज मेंढे यांनी आपल्या प्रवचनातून बुद्ध धम्माचे सार विषद केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. राजेश मनोहर हे होते आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार मा. गौतम शेंडे यांनी व्यक्त केले. शेवटी अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रजापती महिला संघाच्या सर्व सदस्या, म. फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे सर्व सदस्य आणि जिवक सामाजिक व सांस्कृतिक प्रबोधन संस्था, पुष्करणा नगर, धा. रे च्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.