घाटंजी तालुक्यातील सीमावर्ती ताडसावळी येथील लालतोंडी उपद्रवी माकडांना अखेर केले पिंजऱ्यात जेरबंद

सांगली येथील वन्यजीव मित्र टीमने व सहकाऱ्यांनी केली कार्यवाही.
घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
घाटंजी तालुक्यातील पारवा वनपरीक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या ताडसावळी येथे मागील काही वर्षांपासून ग्रामस्थांना त्रस्त धाकेजून करून सोडलेल्या ताडसावळी गावातील २८लाल तोंड्या माकडांना नुकतेच पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. ही कार्यवाही सांगली जिल्ह्यातील मिरज येथील वन्यजीव मित्र समशेर खान मनेर व त्यांच्या टीम यांनी सहकाऱ्यांचे मदतीने केली.त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
ताडसावळी गावात मागील काही वर्षांपासून ३०ते ३५ माकडांचा मुक्तसंचार आहे. त्यात ह्या माकडांच्या उपद्व्यापामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले होते.या उपद्रवी माकडांनी मानवी वस्तीत घरांच्या पत्रावर,छतावर निवारा करण्यास सुरुवात केल्याने माकडांचा धुडगूस अधिकच वाढला होता.पत्रांवर आणि घरांच्या छतांवर माकडांचा वावर वाढल्याने अनेक घरांची टीनपत्रे खिळखिळे होऊ लागली होती इतकंच नाही तर, दुकानात घुसून बिस्किटे,चिप्सची पुडे व इतर खाद्यपदार्थ लंपास करणे ही करामत ही माकडे करत होती. तसेच छतावर वाळू घालण्यात येणारे धान्याची नासाडी करणे, घरावरील डीश टिव्हीच्या छत्र्या हलविणे व इतर साहित्याची नासधूस या माकडांकडून नित्याने केली जात होती.अनेक वेळा स्वयंपाक घरात घुसून भाकरी पळविण्याचे प्रकारही घडले आहेत.या माकडांना अडविण्याचा प्रयत्न केला,तर अनेक महिलांवर हल्ला करून जखमी केल्याच्या घटना घडल्या.माकडांच्या या उपद्व्यापाला वैतागलेल्या ग्रामस्थांनी अनेक वेळा वन विभागाकडे तक्रार केली. एवढंच नाही तं माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन वन विभागाकडे दाखल करण्यात आला होता.काही वर्षांपूर्वी वनविभागाचे शार्प शुटरचे पथकही आले होते, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यानंतर मनीष पवार वनपरीक्षेत्र अधिकारी पारवा, कुर्ली येथील वनपाल धम्मानंद मेश्राम,वनपाल शांतिदूत मुळे यांच्या मदतीने व ग्रामपंचायतीच्या व गावाकऱ्यांच्या पाठपुराव्याने मिरज जि.सागली येथील वन्यजीव प्राणि मित्रांचे एक पथक नुकतेच गावात दाखल झाले.या पथकातील समशेर खान मनेर आणि सुब्हान खान व अल्ताफ या त्यांच्या सहकाऱ्यांनी गावाच्या मध्यभागी पिंजरा लावून २८ माकडांना कोणतीही इजा न होऊ देता मोठ्या शिताफीने पिंजऱ्यात जेरबंद केले. त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला अखेर माकडांचा बंदोबस्त झाला.
या सर्व माकडांना सुखरूप पणे अभयारण्यात नेऊन सोडण्यात आल्याचे वनपाल मेश्राम यांनी सांगितले. या कामगिरी ने आंनदीत होऊन ग्रामस्थांनी ठेवलेल्या सत्काराच्या कार्यक्रमात वनविभागाचे किरण जगताप उपवनसंरक्षक पांढरकवडा, कोंडावार सहाय्यक वनसंरक्षक,मनिष पवार वनपरीक्षेत्र अधिकारी पारवा,वन्यजीव मित्र समशेर खान, वनपाल धम्मानंद मेश्राम, शांतिदूत मुळे, राजू बल्लूरवार पारवा यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांच्या वतीने वन विभागाच्या अधिकाऱ्यांचे शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच सोनल प्रशांत दोंतुलवार, उपसरपंच अनिता किष्टू शेरपूरवार, माजी सरपंच जयवंतराव चिल्लावार, किशोर चिल्लावार, रमेश कोटावार, ईस्तारी मडावी, प्रशांत दोंतुलवार, राजु कोवे, निरंजन गेडाम,रवींद्र मंगलपवार, अशोक सोनटक्के,किष्टू शेरपूरवार, गजानन येंड्रावार, नवनित पिटलावार, संतोष येरावार, सतिष बच्चुवार, दत्तात्रय पिटलावार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.