सोशल मीडियावर आलेला मेसेज, तिचा न्यूड कॉल आणि तरुणाचे आयुष्य बरबाद

हैदराबाद / विशेष प्रतिनिधी
सध्या सोशल मीडियावरून फसवणुकीच्या घटनेत जबरदस्त वाढ झाली आहे. त्यामुळे सायबर विभागाची डोकेदुखी वाढली आहे. ऑनलाइन फसवणुकीला सगळ्याच वर्गातील लोक बळी पडत आहेत. उच्च अधिकाऱ्यापासून तर न्यायाधीशांपर्यंत च्या लोकांचा यात समावेश आहे. अश्याच एका प्रकरणात तरुण फसल्याने त्याचे आयुष्य बरबाद झाले आहे. ब्लॅकमेल करून एका तरुणीने हैदबादमधील तरुणाला लाखो रुपयांनी गंडा घातला आहे.
याप्रकरणी तरुणीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. याप्रकरणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील चेर्लोपल्ली गावात राहणाऱ्या एका २७ वर्षीय भरत नावाच्या तरुणाबरोबर हा प्रकार घडला. २०१९ मध्ये त्याला ‘एक्स’वर सोशल मीडिया साईटवर एका तरुणीचा मेसेज आला होता. त्या तरुणीने स्वतःला असहाय असल्याचे सांगत, पैसे कमावण्यासाठी चेहरा झाकून न्यूड कॉल करण्याचा दावा केला. एक हजार रुपयांत दहा मिनिटे ऑनलाइन राहील, असेही तिने सांगितले.
या आमिषाला भरत बळी पडला. त्याने टेलिग्रामच्या माध्यमातून त्या तरुणीचा नग्न व्हिडीओ पाहू लागला. मात्र, त्यानंतर तरुणीने स्क्रीनशॉट घेत भरतला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. या ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून तिने भरतकडून हळूहळू लाखो रुपये उकळले. यासोबतच तिने त्याच्यावर लग्नासाठी दबावही टाकण्यास सुरुवात केली. २०२१ मध्ये दोघांची लखनऊ आणि गोरखपूर येथे भेट झाली. त्यानंतर २०२३ मध्ये ती तरुणी हैदराबादला पोहोचली आणि भरतवर लग्न करण्यासाठी दबाव वाढवला. भरतने लग्नास नकार दिल्यास आत्महत्या करेन, अशी धमकीही तिने दिली.
दरम्यान, भीती आणि मानसिक तणावाखाली भरतने मार्च २०२५ मध्ये मंदिरात तिच्याशी विवाह केला. त्यानंतर कोर्ट मॅरेज करून विवाहाची अधिकृत नोंदणीही करण्यात आली. मात्र, लग्नानंतरही फसवणुकीचा प्रकार थांबला नाही. भरतने केलेल्या आरोपानुसार, विवाहानंतरही ती तरुणी दुसऱ्या एका युवकाच्या सतत संपर्कात होती. याच काळात तिने भरताकडून ऑनलाइन माध्यमातून ४० हजार रुपये ट्रान्सफर करून घेतले. नंतर भरतला समजले की, ज्या युवकासोबत ती संपर्कात होती, तो तिचा दुसरा पती होता.
भरतने आणखी चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. ते बघून त्याच्या पायाखालची वाळूच सरकली. तो या तरुणीचा तिसरा पती असल्याचं त्याला समजलं. तिच्या पहिल्या विवाहासंदर्भातील प्रकरण आधीपासूनच न्यायालयात प्रलंबित आहे,अशी माहितीही समोर आली. अशातच देवरिया येथे जाण्याचे सांगून ती तरुणी चार लाख रुपये रोख आणि दागिने घेऊन फरार झाली. त्यानंतर न्यायाच्या शोधात भरत देवरिया येथे पोहोचला. मात्र, पोलिसांनी त्याचा अर्ज स्वीकारला असला तरी हा प्रकार आंध्र प्रदेशातील असल्याचे सांगत तेथेच तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला.




