क्राइम
बहिणीच्या मैत्रीणीवर मैत्रिणीचा भाऊ आणि त्याच्या मित्रांकडून सामूहिक अत्याचार

घटनेबद्दल माहिती होताच आरोपीच्या वडिलांना हार्ट अटॅक
नागपूर / विशेष प्रतिनिधी
नागपूर मध्ये घडलेल्या एका घटनेने जिल्ह्यात खळबळ माजली आहे. येथे मैत्रिणीचा भाऊ आणि त्याच्या मित्रांनी बहिणीच्या अल्पवयीन मैत्रीणीवर सामूहिक अत्याचार केला आहे. घटना नंदनवन पोलीस स्टेशन च्या हद्दीत घडली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत तीन मुलांना ताब्यात घेतलं आहे. यापैकी एका तरुणाला अटक केली आहे. तर दोन मुलं ही अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस या प्रकरणी योग्य ती कारवाई करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मुख्य आरोपी हा स्वतः अल्पवयीन असून तो बारावीचा विद्यार्थी आहे. पीडित मुलगी ही मुख्य आरोपीच्या बहिणीची मैत्रीण होती. याच ओळखीचा फायदा घेत आरोपीने तिला अनेकदा भेटण्यासाठी बोलावले होते. मात्र, पीडितेने त्याला वारंवार नकार दिला. असे असतानाही आरोपीने तिला मेसेज करणे सुरूच ठेवले. अखेर ४ फेब्रुवारी रोजी आरोपीने पीडितेशी संवाद साधून तिला आपल्या घरी बोलावले.
पीडित मुलगी जेव्हा आरोपीच्या घरी पोहोचली, तेव्हा तिथे आरोपी आणि त्याचे दोन मित्र आधीच उपस्थित होते. मुख्य आरोपीने मुलीला एका खोलीत नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. धक्कादायक बाब म्हणजे, हे कृत्य घडत असताना बाहेर असलेल्या त्याच्या दोन मित्रांनी या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला. यानंतर, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत इतर दोन आरोपींनीही पीडितेवर आळीपाळीने अत्याचार केला.
या घटनेनंतर आरोपींनी पुन्हा एकदा पीडितेला तो व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला आणि तिला पुन्हा भेटायला बोलावले. मात्र, या जाचाला कंटाळून आणि प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत असलेल्या पीडितेने अखेर धाडस दाखवून आपल्या कुटुंबाला आपबिती सांगितली. त्यानंतर नंदनवन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तीनही आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर पोक्सो (POCSO) कायद्या अंतर्गत आणि बलात्काराचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गुन्ह्याचा कुटुंबावरही परिणाम
या घटनेचे पडसाद आरोपींच्या कुटुंबावरही उमटले आहेत. मुख्य आरोपी हा बारावीचा विद्यार्थी असून, मंगळवारी त्याचा पहिला पेपर होता. मात्र, पोलीस कोठडीत असल्याने त्याला परीक्षा देता आली नाही. आपल्या मुलाने अशा प्रकारचे घृणास्पद कृत्य केल्याचे समजताचआरोपीच्या वडिलांना धक्का बसला असून त्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. पोलिसांनी आरोपींचे मोबाईल जप्त केले असून, अत्याचार करतानाचा व्हिडिओ खरोखर काढला होता का आणि तो कुठे शेअर केला आहे का? याचा तांत्रिक तपास सध्या सुरू आहे.




