रानडुकरांच्या त्रासामुळे केळी पिकांचे नुकसान, शेतकरी हवालदिल
आधीच बँकेचे थकीत कर्ज आणि पुन्हा शेतकऱ्यावर संकट
वनविभागाची शेतकऱ्यांप्रती अनास्था
अंजनगाव सुर्जी मनोहर मुरकुटे
आधीच शेतकरी हा सततच्या निसर्गाचे अवकृपेने आर्थिक अडचणीत असताना मोठ्या मेहनतीने कर्जबाजारी होऊन शेतकरी आपल्या शेतीची मशागत करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्याने कर्जबाजारी होऊन पीक उभे केले, परंतु गेली दोन वर्षांपासून आधी निसर्गाने मारले त्यांनतर सततच्या रानडुकरे ,रोही , हरणांच्या हैदोसामुळे अंजनगाव तालुक्यातील उभी पिके ही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे शेतकऱ्याने आपला प्रपंच कसा चालवावा हा प्रश्न त्याच्यासमोर निर्माण झाला आहे
सविस्तर असे की अंजनगाव सुर्जी येथील शहापुरा येथे वास्तव्यास असणारे निलेश नामदेवराव नाठे यांचे मौजा वडाळी जेठमलपूर सर्वे क्रमांक १३ मध्ये ०.९० आर शेती असून त्या शेतीमध्ये त्यांनी दिनांक २२/५/२०२३ ला टिशू कल्चर महागडे खर्चाचे केळी या पिकाची लागवड केली, तेव्हापासून त्या पिकाची मेहनत करीत असताना लागवडीचे ४५ दिवसाचे लागवडी दरम्यान केळीचे पिक चांगले ४५ दिवसाचे झाले असताना अचानक रानडुकरांनी त्यांच्या शेतामधील ४०० ते ५०० केळीचे झाडे हे उकडून त्याचे नुकसान केले त्यानंतर ,पुन्हा दिनांक १६/८/२०२३ ला त्याच शेतातील २०० ते ३०० केळीचे झाडे उकरून नुकसान केले त्यामुळे निलेश नाठे हे फार मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून निलेश नाठे हे अत्यंत गरीब शेतकरी असून त्यांच्याकडे आधीच बँक ऑफ महाराष्ट्राचे रुपये दोन लक्ष थकीत कर्ज आहे निलेश नाठे हे शेतकरी आधीच कर्जबाजारीपणामुळे हवालदिल झाले असताना त्यामध्ये सध्या स्थिती गेली दोन महिन्यात मोठ्या मेहनतीने उभ्या केलेल्या केळी पिकाचे नुकसान झाले त्यामुळे त्यांना आत्महत्या शिवाय पर्याय नाही असे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे याबाबत वेळोवेळी वनविभागाला कळविले असताना सुद्धा त्यांनी या रानटी जंगली जनावरांचा कोणताही बंदोबस्त केला नसून तसेच अद्याप पर्यंत वनविभागाने साधी पाहणी सुद्धा केली नाही त्यामुळे शेतकऱ्यांचा वाली कोण हा प्रश्न निर्माण झाला आहे ,
याबाबतची तक्रार निलेश नाठे यांनी नुकतीच, कृषिमंत्री धनंजय मुंडे, वनविभाग परतवाडा तहसीलदार अंजनगाव सुर्जी, त्यांच्याकडे केली असून शासन त्यांच्या नुकसानीबाबत काय कारवाई करणार आणि काय मदत करणार याकडे या भागातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे